Sanvad News दिव्यांगत्वावर मात करणाऱ्या आदित्य गायकवाडची गरुड भरारी;बारावीच्या परीक्षेत मिळविले ७७ % गुण

दिव्यांगत्वावर मात करणाऱ्या आदित्य गायकवाडची गरुड भरारी;बारावीच्या परीक्षेत मिळविले ७७ % गुण

आदित्य बाळू गायकवाड याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो..

                      

 नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. गेली अनेक वर्षापासून अंथरुणावर खिळून असलेल्या आदित्यने जिद्दीच्या जोरावर आपल्या दिव्यांगावर मात करत कला शाखेत कुपवाड मधील देशभक्त आर.पी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात 77% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकविला. तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.जिद्द असेल तर दिव्यांगावर मात करून यश संपादन करता येते याची प्रत्यक्ष प्रचिती त्याने दिली.
             वास्त्विक पाहता आदित्यला अभ्यासाची खूप आवड. कायमस्वरूपी अंथरुणावर पडून असल्यामुळे त्याने स्वतः वाचन करण्याचा छंद जोपासला. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आदित्य पटकन देत असे. दुर्देव इतकच की तो अंथरुणावर खेळून असल्यामुळे शाळेमध्ये जाऊ शकत नव्हता. 


शाळेत येऊ शकत नाही, शाळेत न आल्यामुळे उपस्थितीवर परिणाम होतो,त्यातून नापास झाला तर शाळेच्या निकालावर परिणाम होऊन शाळेचे नाव लौकिक खराब होईल असे  सांगून एका नामांकित शाळेने याच आदित्यला इयत्ता दहावी मध्ये प्रवेश नाकारला होता. 
त्याच वेळी आदित्यच्या खूप शिकण्याच्या जिद्दीला पूर्णविराम मिळणार होता,शिक्षणच थांबणार होते.
   प  ज  आ माजी आमदार प्रा.शरद पाटील सर यांनी त्यांच्या कुपवाड येथील देशभक्त आर. पी.पाटील विद्यालयात कोणताही विलंब न करता मोठ्या आनंदाने आदित्यला प्रवेश दिला.मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम व त्यांच्या सर्व शिक्षक स्टाफ यांनी वेळोवेळी आदित्यला मार्गदर्शनही केले. एका नामांकित शाळेने प्रवेश नाकारलेल्या या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी मध्ये देखील  73% गुण मिळवून दिव्यांगा वर मात करण्याची क्षमता स्वतः मध्ये असल्याचे दाखवून दिले होते.

   आदित्यचे वडील म्हणजे आमचे मित्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मिरज तालुक्याचे अध्यक्ष,   जिल्हा परिषद शाळा कुपवाड नंबर 2 चे उपक्रमशील शिक्षक बाळू गायकवाड व त्याची आई श्रीम.स्वाती ओंकारे या सुद्धा जिल्हा परिषद शाळा यशवंतनगर च्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका. दोघेही शिक्षक असल्यामुळे आदित्यचे सर्व आवरून हे दोघेही शाळेला जात. आदित्यचा लहान भाऊ अभिषेक हा सुद्धा शाळेला जात.त्यावेळी आदित्य एकटाच घरात अंथरूणावर पडून असायचा.शाळा जवळच असल्याने दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत स्वतःच्या जेवणाचा विचार न करता स्वाती मॅडम आपल्या लेकरासाठी घरी येत. आदित्यला अंथरूणावर स्वतःला हलता येत नव्हते म्हणून त्याची कूस बदलून,त्याची पुन्हा सुश्रुषा करून, त्याला खाऊ घालून,जेवणाची सुट्टी संपण्यापूर्वी त्या पुन्हा शाळेत हजर होत. असा दैनंदिन नित्यक्रम या दोघा आई-वडिलांचा असे. घरातील या इतक्या मोठ्या समस्येचा दांडोरा या दोघांनी कधीही कोणासमोरही मांडला नाही किंवा समस्या पुढे करून नाहक सवलत ही घेतली नाही. स्वतःच्या मनातील दुःख इतरांनाही त्यांनी कधी सांगितलं नाही.प्रत्येक दुःखाचा सामना या दोघांनीही हसत हसत केला आणि अजूनही करत आहेत. घरच्या समस्यांचा परिणाम शाळेतील अध्ययन अध्यापनावर कधीही त्यांनी होऊ दिला नाही. मिरज तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या यादीमध्ये बाळू गायकवाड व स्वाती ओंकारे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.

           आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून शाळेतील सामान्य कुटुंबातील मुलांना जीव लावून शिकवल्याचे फळ म्हणजेच दिव्यांगा वर मात करून आदित्यने मिळवलेले हे यश असेच म्हणावे लागेल. आदित्यचे  अशा खडतर परिस्थितील यश पाहता आदित्य बाळू गायकवाड याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो....! 
       महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तमाम तालुका जिल्हा व राज्य पदाधिकारी शिक्षक बंधू-भगिनी यांच्याकडून आदित्यचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा.
शब्दांकन -
अमोल माने,जिल्हा सरचिटणीस, 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सांगली.


To Top