Sanvad News रक्षाबंधन-उत्सव नात्यांचा, बहिण भावाच्या निरपेक्ष प्रेमाचा. लेखक -डॉ. संतोष माने

रक्षाबंधन-उत्सव नात्यांचा, बहिण भावाच्या निरपेक्ष प्रेमाचा. लेखक -डॉ. संतोष माने

          

संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे हाहाकार माजून नकारात्मकता पसरली आहे. प्रत्येक देश आपआपल्या परीने या वैश्विक महामारीवर तोंड देत आहे. आपत्ती, संकट, दुःख यावर मात करण्यासाठी खरी गरज असते ती सकारात्मक ऊर्जेची. हीच ऊर्जा मानवाला अनेक आव्हानात्मक लढाई साठी शक्ती, बळ, धैर्य देत असते.भारतीय संस्कृतीत निसर्गाच्या ऋतू कालमानानुसार संपन्न होणाऱ्या विविध सण,व्रत, वैकल्यातून सकारात्मक ऊर्जेची देणगी आपल्याला प्राप्त होते. या सणातून मानवी मनाला सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून चैतन्यदायी निरपेक्ष आनंद मिळतो. यातूनच माणूस येणार्‍या प्रत्येक संकटावर धैर्याने तोंड देऊन जीवन आनंदाने जगत असतो. नैसर्गिक आपत्ती व इतर प्रसंगाच्या वेळी एकमेकास आधार देत एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन मानवास समाधानाने जीवन जगण्याचा संस्कार या सणातूनच होत असतो. सामाजिक स्वास्थ्य व समाजात ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात.अध्यात्म व विज्ञानाचा समन्वय साधून मानसशास्त्रीय व पर्यावरणीय दृष्टीने सण साजरे करणे आवश्यक आहे.


भारतीय संस्कृतीतील सर्व सण हे आनंदोत्सव असतात. दैनंदिन रहाटगाड्यातून चाकोरीच्या थोडेसे बाहेर येऊन मनाला प्रफुल्लित करणारे जीवन आनंदाने जगण्यासाठी नवीन उमेद देणारे हे सर्व सण, उत्सव प्रत्येक जणआपआपल्या परीने साजरे करत असतो. या सणामुळे समाजातील सर्व घटक व घरातील प्रत्येक सदस्य एकत्र येतात त्यामुळे त्यांच्यातील प्रेम, माया, आपुलकी, माणुसकी, स्नेहबंध अधिक दृढ होत असतात. सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील साजरे होणारे सण हे निरपेक्ष आनंदाचा खजिनाच असतो. जनमाणसात भक्ती,श्रद्धा, सामंजस्य, आपुलकी, प्रेम, एकता, देशभक्ती, सामाजिक ऐक्य इत्यादी भाव वृंध्दिगत करून एक आदर्श समाज निर्माण करण्याचा उदात्त दृष्टीकोन सण साजरे करण्यामागे दिसून येतो. पण आजच्या आधुनिक युगात भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या मानवास विविध सण व्रतवैकल्ये या मागच्या खऱ्याखुऱ्या उद्देशाचा विसर पडला आहे. त्यामुळे हे सण आज फक्त इव्हेंट म्हणून संपन्न केले जात आहेत. त्यामागचा संस्काराचा व नैतिक मूल्यांचा असणारा उद्देश माणूस विसरत चालल्यामुळे समाजामध्ये आज अराजकता, दुराचार, नैराश्य वाढण्यास सुरुवात झालेली आहे. समाजातील एकत्र कुटुंबपध्दती ऱ्हास होत आहे. विज्ञानाच्या प्रगतीने संपूर्ण जग जवळ आले मात्र समाजात असणारी माणुसकी व घरातील संवाद कमी होत चालला आहे. स्वार्थी प्रवृत्तीमुळे तसेच संस्कार मूल्यांच्या ऱ्हासामुळे अनेक नाती गोती संपुष्टात येत आहेत. महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतात आजरोजी लहान मुली व महिला यांच्या वरील बलात्कार, अत्याचाराचे वाढते प्रमाण सर्वाचे मन सुन्न करणारे आहे. हे आपणास भूषणावह नाही. असं आपल्या देशात व्हायला नको म्हणून अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी व समाजाच्या प्रगती साठी सणातून प्राप्त होणारी सामाजिक, नैतिक बंधने व संस्कार मूल्ये सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मनाला सकारात्कम ऊर्जा, उभारी, नवी उमेद प्रदान करणारा व आनंद उत्साहाने भरलेला श्रावण महिन्यात बहीणभावाच्या नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधन हा सण म्हणजे नैतिक मूल्याचे व संस्काराचे अनमोल रतन आहे. आजची सामाजिक परिस्थिती पाहता स्वतःच्या बहिणीचे संरक्षण करणे हे जसे अभिमानास्पद आहे, तसे समाजातील इतरांच्या बहिणीचे, महिलांचे रक्षण करणे हे राष्ट्रीय कर्तव्याएवढे महत्त्वाचे आहे. याकरिता बहीण भावाच्या प्रेमाचा व नाती समृद्ध करणारा रक्षाबंधन हा सण प्रत्येकाने आपल्या कृतीतून साजरा केला तर समाजातील सर्व घराघरातून आनंद द्विगुणित होईल. यातूनच सामाजिक ऐक्याची भावना दृढ होऊन राष्ट्राचा विकास होईल.
भारतीय संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण राखी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी सदैव खंबीर आहे याची ग्वाही ही भाऊ देतो.या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधत असताना भावास दिर्घायुष्य प्राप्त होऊन सर्व सुख लाभावे म्हणून प्रार्थना करते. यासर्व कृतीच्या मागे नैसर्गिक, मानसशास्त्रीय व वैज्ञानिक तत्व असल्याकारणानं कोणताही जातीभेद न मानता साजरा होणारा रक्षाबंधन सण हा नातीगोती वृद्धिंगत करणारा सण आहे. प्राणी, निसर्ग, मानव यासर्वामध्ये आपुलकी, प्रेमा, दयाभाव, त्याग, समर्पण यांचे एक अतूट बंधन आहे.


स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सदविचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. अ‍ॅक्युप्रेशर तत्वानुसार कपाळाच्या मध्यभागी नाकाच्या रेषेवर व दोन्ही भुवयांच्या मधोमध असलेले यीन ट्यांग बिंदू महत्त्वाचे असतात.या बिंदूवर योग्यप्रकारे दाब दिल्याने डोकेदुखी कमी होते व मनःशांती प्राप्त होण्यासाठी मदत होते. पाचनक्रिया व पित्ताशय यांना उत्तेजना मिळते. येथे दाब दिल्यानंतर भावनिक अडथळे व ताण दूर होऊन ध्यान करण्यास मदत होते. त्यामुळे एकाग्रता वाढते.
उजव्या हाताच्या मनगटावर जेथे राखी बांधली जाते त्याठिकाणी पेरीकार्डियम-६ हा दाब बिंदू अ‍ॅक्युप्रेशर करिता महत्त्वपूर्ण असतो.योग्यप्रकारे हालकासा दाब दिल्याने सर्दी, ताप, अशक्तपणा, मळमळ या समस्या बऱ्या होऊन सुदृढ आरोग्य प्राप्त होते.डोके, डोळे आणि चेहरा यांना या बिंदू वरील दबाव तंत्राने ऊर्जा मिळते. तसेच ज्याठिकाणी राखी बांधतात, तेथे मूत्राशय वे प्रोस्टेट ग्रंथीचे प्रतिबिब बिंदू असतात. ज्यावर दाब दिल्याने तेथील स्थायी जैव ऊर्जा गतिमान होऊन तिचे रूपांतर गतिशील ऊर्जेमध्ये होते. ज्यामुळे आपले शरीर स्वस्थ व मन प्रसन्न होण्यास मदत होते. शरीरामध्ये चैतन्य शक्ती जागृत होऊन एक प्रकारचे तेज निर्माण होते. जे आपल्याला व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसून येते.


प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर सूक्ष्म आज्ञाकेंद्रे असतात. त्या केंद्रावर अंगठयाने दाब देऊन बहीण कुंकवाचा टिळा लावते. आपल्या भावाचे आज्ञाकेंद्र जागृत करण्याचा प्रयत्न बहीण कुंकवाचा टिळा लावून करते. यामुळे कपाळावरील शक्तिकेंद्र गतिमान राहतात व शरीरातील ऊर्जेचे प्रमाण संतूलन होते. म्हणून शरीर निरोगी राहते. तसेच कुंकू हा पक्का पदार्थ तयार होण्यासाठी हळद-चुना, लिंबू हे पदार्थ एकत्र करावे लागतात. त्याचप्रमाणे भाऊ- बहीण जरी भिन्न स्वभावाचे असले तरी एकमेकांच्या सुख दुखात विभिन्न व्हायचे नाही हे कुंकू प्रतीकात्मक सांगत असते. तो टिळा म्हणजे केवळ त्याचा आदर नसून त्यांच्यात सदविचार, सद्बुद्धी, सौख्य जागृत राहावी यासाठीची पूजा असते. भावाच्या जीवनातील चेतना, ऊर्जा कायम स्वरूपी टिकावी म्हणून बहीण भावाला ओवाळण्यापूर्वी डोक्यावर अक्षता टाकते कारण अक्षता म्हणजे कायम स्वरूपी होय. ज्याप्रमाणे दीपज्योत अंधाराला नाहीशी करते. त्याप्रमाणे आपल्या भावाचं आयुष्यही असच तेजोमय व्हावं, समृद्ध व्हावं, त्याच्या कडून सर्वांचं कल्याण व्हावं, असा विचार बहीण भावाला ओवाळताना करीत असते. अशा प्रकारे बहीण भावाचा रक्षा बंधनाचा सण हा त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याच्या रूपाने प्रेमाचे रंग भरतो आणि भाऊ आपल्या बहिणीला प्रेमपूर्वक आपुलकीची भेटवस्तू देत असतो. बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ आपल्याकडे घेतो. तुटलेली नाती जोडावीत , जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी हा संदेश देणारा रक्षाबंधन सण.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते. कुटुंबातील 
एकमेकांना जोडून नाती समृध्द करणारा असा हा सण जगातील इतर कोणत्याही  संस्कृतीत नाही.  रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.     
 स्त्री किती ही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. 

बहिण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते त्यावेळी राखी ही संरक्षणाची, बंधनाची व जबाबदारीची जाणीव निर्माण करून देते. म्हणूनच
 रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला जात-धर्म-पंथाला छेद देत इतिहासही साक्षी आहे. हे संदर्भ लक्षात घेऊन राखी बांधली तर बांधून घेणारा आजन्म कृष्णासारखा होतो. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या  व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.
"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे.
रक्षाबंधन म्हणजे ध्येय- रक्षण. ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे. जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेला आहे तोच जीवनात यशस्वी होऊ शकतो. हीच शिकवण आपली भारतीय संस्कृती रक्षाबंधन या सणातून देते.  भाऊ व बहीण परस्पर प्रेरक, पोषक व पूरक आहेत. हा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे , प्रत्येक बहिणीने कोणतीही भौतिक आशा न बाळगता भावाला राखी बांधली पाहिजे, तरच रक्षाबंधन हे संरक्षणाचे अतूट बंधन होईल. 
पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे  आपल्या
समाजात वाढता चंगळवाद, अत्याचार, अश्लीलता या नैतिक पतनाचे जे  केविलवाणे चित्र आपण पाहतो आहे. भौतिक सुखाच्या हव्यासापोटी सामाजिक, सांस्कृतिक स्थर घसरल्याने आज लहान मुलींच्या सहित महिलांच्या वरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारतात ह्रदयी स्पर्शी नात्यातील व माणुसकी मधील संवेदना संपत चाललेली पहावयास मिळते आहे. त्यामुळे समाजाची व सांस्कृतिक मूल्यांची अधोगती होऊ लागली आहे.  नैसर्गिक, नैतिक मूल्यांचे पतन व सामाजिक बांधिलकीची अधोगती थांबविण्यासाठी आपण साजरा करणाऱ्या रक्षाबंधन सणातून निर्माण संस्कार सर्वांनी प्रत्यक्षात कृतीत आणले पाहिजेत. अनैतिकतेचा उन्माद स्वच्छ सामाजिक वातावरणाला बाधा आणत असेल तर समाजातील प्रत्येकाला त्याची दखल घ्यावीच लागेल. सामाजिक स्वास्थ निरोगी व निकोप राहण्यासाठी सर्वांनी सामाजिक बंधने पाळली पाहिजेत.संस्कार आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुसंस्कारित शिक्षणाने मानवाचे व्यक्तिमत्व घडत असते. आपला देश समृध्द होण्यासाठी इतर गोष्टी बरोबर नातेसंबंध दृढ करून सामाजिक बांधिलकी जपणे महत्त्वाचे आहे.


रक्षाबंधन म्हणजे फक्त आपल्या बहिणीचेच नव्हे तर  समाजातील सर्व महिलांचे संरक्षण, संवर्धन व सन्मान करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. यांची जाणीव  समाजातील सर्व पुरुषांना क्षणोक्षणी व्हावी या दृष्टीने संस्कार रुजविण्यासाठी रक्षाबंधनाचा हा उदात्त व पवित्र हेतू आहे. त्यासाठीच भारतीय संस्कृती राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. अनमोल नाती टिकवण्याबरोबर जैवविविधता व पर्यावरण  संवर्धन होणेसाठी सर्वांनी मिळालेल्या  स्वातंत्र्याचा अस्वाद घेत परंतु स्वैराचाराचा उन्माद न करता नैतिक मूल्याचे बंधन स्विकारले पाहिजे. आधुनिक युगामध्ये निर्माण झालेली नात्यातील व समाजातील दरी मिटविण्यासाठी रक्षाबंधन हा सण  सांस्कृतिक व सामाजिक वारसा असून भारताने जगाला अनमोल विचार दिला आहे. समाजाप्रतीची बांधिलकी म्हणून सणातून मिळणारे संस्कार नवीन पिढीला देणे गरजेचे आहे.

राष्ट्रउभारणीकरिता जिज्ञासू, समाधानी, परोपकारी, कर्तव्य निष्ठ, राष्ट्राभिमान व निर्मळ अंतःकरण असणारी सुसंस्कारित पिढी निर्माण करणे गरजेचे असते. देशासाठी निस्वार्थी व उत्तम नागरिक होण्यासाठी भाव- बहिणीच्या नात्याच्या विणा घट्ट करणारा या सणाला सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व शास्त्रीय दृष्टीने ही महत्व आहे.राखी बंधन हा सण आपण इतर नात्यामध्ये, माणुसकी, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, पर्यावरण संरक्षण आदींच्या करताही साजरा केला पाहिजे.
राखी बांधणे म्हणजे श्रद्धा व विश्वास याचा धागा बांधणे. दोन व्यक्तीच्या दायित्वाची स्विकार करणे हा होय.'नाती चरामी' म्हणत सर्वानी हाच अनमोल वारसा जपत समाजात सलोख्याचे, सौहार्दाचे, सामंजस्याचे, सात्विक विचाराचे व विवेकाचे नैतिक बंधन वृद्धिंगत व्हावे या करिता रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

डॉ. संतोष माने सांगली. 
Mobile:+91 84219 60620
To Top