Sanvad News संगीत आणि गाणे हे मन आत्मा व ज्ञानेंद्रियांची शक्‍ती असते-सौ. वृषाली भंडारे;विटा येथे भारतरत्न पं.भीमसेन जोशी जयंती साजरी.

संगीत आणि गाणे हे मन आत्मा व ज्ञानेंद्रियांची शक्‍ती असते-सौ. वृषाली भंडारे;विटा येथे भारतरत्न पं.भीमसेन जोशी जयंती साजरी.


संगीत आणि गाणे हे मन आत्मा व ज्ञानेंद्रियांची शक्‍ती असते असे प्रतिपादन सौ.वृषाली भंडारे यांनी केले.विटा येथील भारतमाता ज्ञानपीठाच्या पु.ल. देशपांडे संगीत कला विद्यालयात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी  विवेक भंडारे हे होते.
यापुढे बोलताना सौ.वृषाली भंडारे म्हणाल्या की,सगळेच सुगंध, सुखकारक असतात. गाणे सुगंधासारखे असते. खडीसाखर तोंडात टाकल्यावर शरीर आनंदी होते, तसे संगीत व गाणे कानी पडताच आत्मानंद मिळतो. पाणी पीत असताना ते थंड, की गरम समजते, तसे गाणे ऐकून ऐकून सुरांचा साज ध्यानात येतो. फुलांच्या गंधाप्रमाणे गाणे वाऱ्यावर स्वार होते. गाणे मनाला चेतना आणि आनंद देते. वृक्षवेली फुले-फळे धरतीकडून स्वतःचा गंध घेऊन येतात, तसे चांगले गाणे आत्म्याच्या शक्तीतून बाहेर पडते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशीचे गाणे मोगऱ्याच्या फुलासारखे सुगंधी होते, ते किती वेळा ऐकले तरी त्याची गोडी संपत नाही.
 " गायक पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर वृषालीचे चुलते, वडील बंधू यांनी तबल्याची साथ सदैव केली, त्यामुळे भीमसेन जोशींचे गाणे अनेक वेळा ऐकता आले हे माझे भाग्य आहे."  सौ. वृषाली भंडारे यांनी भीमसेन जोशी यांची अनेक पदे गाऊन दाखविली.
 स्वराली जाधव, वृषाली पाटील, स्वागत साळुंखे, आरोही डांगे, खुशी धोत्रे,  वैदही जगदाळे, रागिनी यादव, दिशा रसाळ, श्रावणी माने, तनुश्री धर्माधिकारी, साक्षी बनसोडे, श्रेयस जाधव  व आर्यन सावंत या विद्यार्थ्यांनी आपली गायनकला सादर केली. यावेळी  विवेक भंडारे म्हणाले, "पु. ल. देशपांडे आणि भीमसेन जोशी हे महाराष्ट्राला लाभलेली संगीत रत्ने होती." पु. ल.च्या स्मृती जपणारे हे विद्यालय संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवेल.
प्रशालेच्या  प्राचार्या, सौ. वैशाली कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. साहित्यिक  रघुराज मेटकरी सर यांनी आपले विचार मांडले व पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी  सांगितल्या. चंदना तामखडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ. शितल बाबर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
To Top