"विद्यार्थी मित्रांनो,आपले जीवन सुंदर करण्यासाठी रोज एक नवीन पाऊल पुढे टाका. नेहमी प्रयत्नशील रहा. कृतिशील रहा. सकारात्मक दृष्टिकोनातून टाकलेलं पाऊल आपणास ध्येयपूर्तीकडे घेऊन जातं. आज अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून मोबाईल गेममध्ये गुरुफटले आहेत. तुम्ही जाणीवपूर्वक दररोज मैदानावर जात चला. मनसोक्त मैदानी खेळ खेळा. वेगवेगळी पुस्तक वाचा आणि मोबाईल टाळा." असे विचार आयर्न मॅन किरण साहू यांनी श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल हरिपूर येथे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केले. त्यांच्याशी कु अमृता कुंभार व अनिरुद्ध जाधव या विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
शिक्षण विभागाच्या दप्तरावीना शनिवार व हॅपिनेस प्रोग्रॅम अंतर्गत या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नोव्हेंबर महिन्यामध्ये गोव्यामध्ये पार पडलेल्या 'आयर्न मॅन' स्पर्धेत सांगलीतील 19 सहभागींना मार्गदर्शन करून यश संपादन केल्याबद्दल आर्यन मॅन किरण साहू यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ स्मिता बेनिचेेटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
मुलाखतीवेळी विद्यार्थ्यांशी बोलताना किरण साहू पुढे म्हणाले की, "आपण विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधावा.त्यांच्याबरोबर बोलावे. बोलण्यानं व्यक्तिमत्व अधिक चांगलं बनतं. आपण मैदानी खेळ खेळले पाहिजेत. खेळण्यानं मन हलकं होतं. शरीर हलकं होतं. भूक चांगली लागते. झोप चांगली लागते .आरोग्य चांगलं राहतं. अभ्यासातली एकाग्रता वाढते. जीवनातील स्वप्नं पूर्ण करता येतात."
प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख विठ्ठल मोहिते यांनी केले. भारती विद्यापीठ 'गणित व इंग्रजी' प्रज्ञाशोध परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन सुहास कोळी यांनी केले तर अजितकुमार कोळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन राजकुमार हेरले; पूजा पाटील, राजाराम वावरे, संध्या गोंधळेकर यांनी केले. याप्रसंगी मनीषा वड्डदेसाई,बबन शिंदे,सुनील खोत आदी शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.