कडेगांव प्रतिनिधी:
आपली लढाई खोटे बोलणाऱ्या, भ्रष्टाचारी चोरट्यांबरोबर आहे. अशा खोटारड्या आणि चोरट्यांची पैशाची गुर्मी जिरवून पलूस कडेगाव मतदार संघातील लाडक्या बहिणी साध्या भावाला म्हणजे संग्राम देशमुख यांनाच निवडून देतील असा विश्वास भाजप नेत्या आमदार चित्राताई वाघ यांनी व्यक्त केला. त्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी कडेपूर येथील राजवीर मंगल कार्यालयात हजारो महिलांच्या गर्दीत महिला मेळावा बोलत होत्या.
चित्राताई वाघ म्हणाल्या, देशामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने केलेला आहे. गेली 70 वर्षे महिलांना शौचासाठी लोटा घेऊन बाहेर जावे लागत आहे त्यांच्या ह्या इज्जतीचा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालय योजनेच्या माध्यमातून मिटविला आहे.
लाडकी बहीण योजनेला काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाने खिळ घालण्याचा प्रयत्न केला. ही योजना आमिष असल्याचे बोललं गेलं परंतु तेच काँग्रेसवाले आता आम्हीही पैसे देऊ असे म्हणू लागले आहेत. ते धादांत खोटे बोलत आहेत खोटे बोलणाऱ्या या चोरांबरोबर आपली लढाई आहे. महिलांना प्रवासात ५० टक्के सुट दिली, मुलींच्या शिक्षणाची सोय केली, शेतकऱ्यांसाठी वीज पंपाचे बिल माफ केले. त्याचवेळी विरोधी पक्ष मात्र या योजना बंद पडल्या पाहिजेत यासाठी कारस्थान करत होते. ज्यांनी महिलांचा अपमान केला त्यांना अपशब्द वापरले अशा विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करा व भाजपच्या उमेदवारांना विजयी करा.असे अवाहन चित्रा वाघ यांनी केले.
यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या की, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर तुम्हाला सहसा भेटणारा भाऊ हवा आहे. फोन केल्यानंतर काम सांगितलं तर न भेटणाऱ्या माणसाच्या नादी लागू नका. त्याला त्याची जागा दाखवून द्या. आणि जे पैशावर उड्या मारत आहेत त्यांची गुर्मी जिरवा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पैसे आणि साड्या वाटण्यासाठी काही लोक तुमच्या दारात येतील त्यांना हाकलून द्या, त्याला बळी पडू नका. तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ संग्राम देशमुख यांनाच निवडून द्या, असे आवाहन स्वाती शिंदे यांनी केले.
प्रास्ताविक ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख यांनी केले. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ॲड सौ. स्वाती शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरूड, शिवसेना कडेगांव तालुकाप्रमुख प्रदीप कदम, सौ. शिवाणी देशमुख, सौ. रूपाली देशमुख, कडेगांव पंचायत समिती माजी सभापती सौ. मंदाताई करांडे, अनुराधा मोरे, वैशाली यादव, गायत्री सुतार, रिद्धी पाटील, प्रतिक्षा वाघमोडे, ॲड. शुभांगी डांगे -काळे, गौरी जाधव,शहनाज तांबोळी यांची भाषणं झाली. आभार पपीता सुतार यांनी मानले.
दहा एकरात 100 कोटींची वांगी...
चित्राताई वाघ म्हणाल्या बारामतीच्या बहिणीने दहा एकरात 100 कोटींची वांगी पिकविली आहेत. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर त्या म्हणाल्या की तिजोरीत खडखडाट आहे. आणि तीच बहीण पुन्हा तीन हजार रुपये देण्याचा आश्वासन देत आहे. हे म्हणजे लबाडा घरच आमंत्रण असून दहा एकरात 100 कोटीची वांगी पिकवल्या सारखं आहे. नंदांचा पाहुणचार चित्राताई वाघ म्हणाल्या, पलूस कडेगाव मध्ये लाडक्या बहिणींना एक त्यांचं म्हणणं ऐकणारा साधा भाऊ मिळाला आहे. म्हणजे संग्राम भाऊंना त्या मोठ्या फरकाने निवडून आणणार आहेत. त्यानंतर मात्र संग्राम भाऊंच्या पत्नी अपर्णाताई यांनी लाडक्या बहिणींचा चांगला पाहुणचार करावा. आणि सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवून पाहुणचार घ्यावा सुद्धा. यावर सर्व महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली.