औदुंबर प्रतिनिधी
जे मेरीटमध्ये असतात त्यांनाच जनता मतदान करते. सध्याच्या काळात दिल्लीच्या तख्ता विरोधात आपणा सर्वांची लढाई आहे. एक अदृश्य शक्ती दिल्लीतून त्रास देते, धमक्या देते पण त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे तो दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाही असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
औदुंबर ता. पलूस येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ तीर्थक्षेत्र दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी आमदार मोहनराव कदम होते.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बारामती खा.सुप्रिया सुळे, सोलापूर खा.प्रणिती शिंदे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम, विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड, डॉ. जितेश कदम, शरद लाड, यांच्यासह पूजा विशाल पाटील, ममता सिंधुताई सपकाळ, स्वप्नाली विश्वजीत कदम प्रमुख उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्व.डॉ. पतंगराव कदम साहेबांचा स्नेह मला मिळाला ते पांडुरंगाचे भक्त होते. आमची भेट नेहमी पंढरपूरात व्हायची. मी त्यांचे आशीर्वाद घेत होते. त्यांनी शून्यातून विश्व उभा केलं पण दुर्दैवाने ते लवकर आपल्यातून निघून गेले. पलूस कडेगाव मतदार संघात त्यांनी विकास कामांचा अक्षरशः डोंगर उभा केला आहे. राज्यात आदर्श असा मतदारसंघ निर्माण केला आहे. पण त्यांच्या जाण्याने राज्याची फार मोठी हानी झाली. त्या दुःखातून आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी स्वतःला सावरले. राज्यात टॉप पाच आमदारांपैकी विश्वजीत कदम आहेत.विश्वजीत कदम गेल्यावेळी राज्यमंत्री झाले. आपण सर्वांनी या निवडणुकीत त्यांना ताकद द्यावी आणि पहिल्याच यादीत त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावण्यासाठी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन खा.सुप्रिया सुळे यांनी केले.
सोलापूरच्या खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या, स्व. कदम साहेब व सुशीलकुमार शिंदे यांची दोस्ती अवघ्या महाराष्ट्राने बघितली आहे. . डॉ.विश्वजीत कदम यांच्यासारखा आमदार या मतदारसंघाला मिळाला, तुम्हाला मिळाला. हे तुमचं नशीब आहे. मतदार आणि आमदार एवढंच नातं नसून एक भाऊ-बहीण, वडील-मुलगा असं नातं आहे. ते नातं अधिक दृढ करण्यासाठी या निवडणुकीत डॉ. विश्वजीत कदम यांच्या पाठीशी तुम्ही ठाम राहण्याचे आवाहन केले. या भाजप पक्षाला ऐन निवडणुकीत लाडक्या बहिणींची आठवण येते. महिलांना संरक्षण पाहिजे. पैसे नकोत असे त्या म्हणाल्या.
ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, की माझ्या भावासाठी, कुटुंबासाठी मी आज येथे आलेले आहे. आ.डॉ. विश्वजीत कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.
विधान परिषदेचे आ. अरुण लाड म्हणाले, भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग आदींची माहिती दिलेली आहे. परंतु जनतेसाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न आहे. सहा महिन्यात हजारो रेल्वे गाड्यांचे उद्घाटन केले. सामान्य जनता, शेतकरी वर्ग त्यातून प्रवास करणार आहे का बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन यात कोण बसते काय माहिती नाही. सर्वत्र लाडक्या बहिणीचा गाजावाजा चालू आहे. बहिणींच्या हाताला काम द्या. तुमचे पंधराशे रुपये नकोत. यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे. भाजपला हद्दपार करायचं आहे. डॉ. विश्वजीत कदम यांना सर्वांनी साथ देण्यास सांगितले.
पलूस-कडेगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याकरता लागेल ती मदत केली. ताकारी, टेंभूसाठी ते नेहमी निधी आणायचे. या पाच वर्षाच्या कालावधीत मी १२०० कोटींचा निधी या मतदार संघाला दिला. पुरोगामी विचार टिकवण्यासाठी एकसंघपणे, एक विचाराने महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करणार आहे. महापूर आणि कोरोनात विरोधक कुठे होते असा सवाल करत मी विश्वजीत कदम यांचा विरोधक आहे अशी त्यांची आता ओळख झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधानसभेची लढाई डॉ.विश्वजीत कदम यांनी जिंकलीच आहे. फक्त दीड लाख का दोन लाख मताधिक्य एवढेच आता बाकी आहे. आपण सर्वांनी पलूस-कडेगाव मतदार संघ सक्षमपणे सांभाळावा. विश्वजीत कदम यांना राज्यात वेळ दिला पाहिजे. विश्वजीत कदम म्हणजे कर्णाचा दुसरा अवतार असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असतील तर आपली सत्ता येईल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष परिपूर्ण येथे काम करेल असे पाटील यांनी सांगितले.
अंकलखोप सरपंच बेबीताई सावंत, मीनाक्षी सावंत, सपना चौगुले, विठ्ठल मुळीक, बाळासाहेब पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय विभुते, अभिजीत पाटील यांची भाषणे झाली. यावेळी युवा नेते सागर कदम, रामचंद्र कदम, जे.के.जाधव, घनश्याम सूर्यवंशी, सतीश पाटील, भिलवडी सरपंच सीमा शेटे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.