रामानंदनगर ता.पलूस येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा.तेजस चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या कडून विद्यावाचस्पती(डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा.तेजस चव्हाण यांनी मराठी कथेचा रुपबंद या विषयावर डॉ.नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौलिक संशोधन पूर्ण केले आहे. सदर प्रबंधात मौखिक कथेपासून आज अखेरच्या कथेची संरचनेच्या अंगाने तात्विक चर्चा करण्यात आली आहे. आज अखेर कथेची आशयाला केंद्रस्थानी ठेवून आस्वादत्मक चर्चा करण्यात आलेली दिसते. मात्र मराठी समीक्षा व्यवहारात साहित्यकृतीच्या संरचनेची तात्विक चिकित्सा होत नाही.
अशावेळी कथा या साहित्यप्रकाराचा विकासक्रम लक्षात घेण्यासाठी असा अभ्यास होणे गरजेचे होते. सदर संशोधन होणे गरजेचे असल्याचे जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी सुचवले. त्यानुसार डॉ. नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.तेजस चव्हाण यांनी संशोधन पूर्ण केले. संशोधन अधिक अकादमिक व्हावे यासाठी डॉ.रणधीर शिंदे यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले आहे.
या पदवी बद्दल प्रा.तेजस चव्हाण यांचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.