कदम - देशमुखांच्या सत्ता संघर्षात शरदभाऊ ठरले किंगमेकर ; पलूस कडेगांव मतदारसंघात सोशल मीडिया वर कार्यकर्त्यांचा जल्लोष
ग्राउंड रिपोर्ट
पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या डॉ.विश्वजीत कदम आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या मधील लढतीत डॉ.विश्वजीत कदम यांनी सलग तिसऱ्यांदा काँग्रेसचा गड राखण्यात यश प्राप्त केले.निकाल जाहीर होताच कुंडलच्या क्रांती गटाच्या अर्थात पदवीधर आमदार अरुण आण्णा लाड व शरद भाऊ लाड यांच्या कार्यकर्त्यांच्या स्टेट्सला पोस्टर झळकले आम्ही किंग नाही किंगमेकर आहोत...रुबाब फक्त भाऊचाच...शरद भाऊ इज किंगमेकर...
क्रांतीअग्रणी जी. डी.बापू लाड यांच्या परिवाराचे शिक्षण,सहकार ,समाजकारण आणि राजकारणात वेगळच अस्तित्व आहे.पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघात त्यांचं स्वतःच असं एक अस्तित्व आहे,स्वतंत्र असा कार्यकर्त्यांचा गट आहे.यंदाच्या निवडणुकीत हा गट कोणत्या बाजूला झुकणार की नेहमी प्रमाणे तटस्थ भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती.क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांनी संधी मिळाली तर विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या हेतूने चाचपणी देखील केली होती.खरे पाहता आपण आपले अस्तित्व दाखवून देऊया असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता.पण काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट,शिवसेना उबाठा गट अशी माहाविकास आघाडी असल्याने अधिकृत उमेदवारी ही डॉ.विश्वजीत कदम यांनाच मिळणार असल्याने हा विचार बाजूला राहिला.
कडेगांव येथील सभेत अर्ज भरण्यासाठी आमदार अरुण आण्णा लाड यांच्या अनुपस्थिती वरून आपल्या मनोगतमधून डॉ.विश्वजीत कदम यांनी नाराजी व्यक्त केली.याचे पडसाद थेट क्रांती कारखान्यावर उमटले.शरद भाऊ लाड यांनी तर पत्रकार परिषदेत घेऊन विश्वजीत कदम यांना आव्हान दिले .
खा.सुप्रिया सुळे यांची शिष्टाई अन् कुरुबुरीस रामराम...
पदवीधर आमदारकीचा पैरा फेडण्यासाठी आम्ही मदत करू पण राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थतीत बैठक घेऊन आम्ही निर्णय घेऊ. खा.सुप्रिया सुळे यांची शिष्टाई कमी आली नि दोन परिवारातील किरकोळ कुरबुरी होत्या त्या मिटल्या असे दोन्ही नेत्यांनी जाहीर करून एकत्रित प्रचार सभा घ्यायला सुरुवात केली.
हम साथ साथ है चा नारा...
यानंतर मात्र अरुण आण्णा लाड,शरद भाऊ लाड यांनी पलूस कडेगांव मतदार संघातील गावागावात जाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून आपला क्रांती गट डॉ.विश्वजीत कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून त्यांनाच मदत करणार असल्याचे आवाहन केले. मतदार संघात महिलांचं संघटन असलेल्या सौ.धनश्री शरद लाड यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोठे महिला मेळावे घेतले.
बाळासाहेब... हा शरद भाऊंचा शब्द आहे..!
क्रांती गटाचे नेते डॉ.विश्वजीत कदम यांच्या सोबत असले तरी संभ्रमात असलेले कार्यकर्ते नेमके काय करणार? याची सर्वांना उत्सुकता लागली होती.मात्र कदम देशमुख यांना मिळालेल्या कडेगांव तालुक्यात विशेषतः घाटमाथ्यावरील मताची आकडेवारी पाहता घटाखालील अर्थात पलूस तालुक्यातील गावांनी विशेषतः क्रांती गटाच्या बालेकिल्ल्यातून डॉ.विश्वजीत कदम यांना भरघोस मताचे लीड मिळाले आहे."बाळासाहेब....हा शरद भाऊ लाड यांचा शब्द.. अन् एकदा दिलेला शब्द बदलायची आम्हाला सवय नाही." डॉ.विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत कुंडल येथील प्रचार सेभेतील हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे.
जाता जाता ..
डिजिटल वॉर मध्ये राष्ट्रवादी पॉवरफुल...
आमची स्वतःची मतदार संख्या २५ ते ३० हजारांवर असून आम्ही पूर्णपणे डॉ.विश्वजीत कदम यांच्यासाठी काम केले आहे.या ऐतिहासिक विजया मध्ये क्रांती गटाचे योगदान मोठे असून पदवीधर आमदारकीचा पैरा आम्ही फेडला असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच क्रांती गटाने आधीच विजयाचे बॅनर झळकावले आहेत.देशमुख गटांस इशारा तर कदम गटास मैदान कोणत का असेना पण गुलाल आमच्यामुळचं लागू शकतो याची अप्रत्यक्षरित्या जाणीव करून दिली तर नाही ना ?अशी उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.
@ शरद जाधव...