Sanvad News आमचा नेता घासून येणार की ठासून येणार...? कार्यकर्त्यांच्या काळजात झापुक झुपूक...झापुक झुपूक... होतयं; पलूस - कडेगाव मतदार संघात अंदाज लागेना.

आमचा नेता घासून येणार की ठासून येणार...? कार्यकर्त्यांच्या काळजात झापुक झुपूक...झापुक झुपूक... होतयं; पलूस - कडेगाव मतदार संघात अंदाज लागेना.

 आमचा नेता घासून येणार की ठासून येणार...? कार्यकर्त्यांच्या काळजात झापुक झुपूक...झापुक झुपूक... होतयं; पलूस - कडेगाव मतदार संघात अंदाज लागेना.


पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार  डॉ.विश्वजीत कदम  हॅटट्रीक करणार की भाजपचे उमेदवार व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख काही चमत्कार घडविणारं याचा अंदाज बांधताना कार्यकर्त्यांची डोकेदुखी वाढली आहे.आमचाच नेता निवडून येणारं असा आत्मविश्वासपूर्वक दावा व्यक्त करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आपला नेता घासून येणार की ठासून येणार याचा अंदाज मात्र लावता येईना.. अशी दोलायमान स्थिती प्रथमच या मतदार संघात निर्माण झाली आहे.

दिग्गज नेतृत्वात काट्याची टक्कर..

पलूस -कडेगांव तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली  कदम आणि देशमुख घराणी मैदानात असल्याशिवाय लोकशाहीच्या उत्सवात रंगत येत नाही की जनतेच्या अंगात निवडणूक येत नाही.काँग्रेस माहविकास आघाडीचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांनी सुरुवातीपासूनच शिस्तबध्द नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवित  ही निवडणूक हातात घेतली.वेगवेगळे कार्यक्रम,महिला मेळावे,कार्यकर्ते मेळावे,मोठ्या प्रचारसभा,लोकांची विक्रमी गर्दी,मतदार संघात केलेली कोट्यवधीची विकासकामे,पलूस - कडेगांव मतदारसघांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा जाहीरनामा मांडला.त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी तर देशमुखांचे डिपॉझिट जप्त करून दिल्लीश्वर मोदींना खुले आव्हान देण्याचा प्रयत्न केला.विकास कामाबाबत आधी केले नि मग सांगितले असा पावित्रा डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारात राहिला.

दुसऱ्या बाजूला सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी मूठभर कार्यकर्त्यांसह भरलेला अर्ज,त्यानंतर पक्षाकडून उशिरा मिळालेला एबी फॉर्म,संथ गतीने सुरू असलेला प्रचार पाहता ही निवडणूक एकमर्गीच होते की काय असे काही काळ वातावरण दिसत होते पण संग्राम देशमुख यांनी कोणावरही टीकाटिप्पणी न करता पलूस येथील मेळाव्यात केलेलं अभ्यासपूर्ण व मुद्देसूद मांडणी करीत भविष्याचा वेध घेत केलेलं भाषण उपस्थितांना प्रभावित करून गेलं नि वातावरण एकदमच बदलत गेलं.सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली कोट्यवधीची विकासकामे,त्यामध्ये पलूस कडेगांव तालुक्यात महायुती सरकारच्या माध्यमातून खेचून आणलेला सर्वाधिक निधी आदी मुद्दे त्यांनी प्रचारात आणले.केवळ रस्ते आणि गटारी याही पेक्षा मतदार संघाचा शाश्वत विकासाची भूमिका मांडत तुमच्या हाकेला साथ देणाऱ्या संग्रामला एकदा संधी तर देऊन बघा अशी भावनिक साद घातली.मोठमोठ्या जाहीर सभा,मेळावे, रोड शो यांना फाटा त्यांनी थेट मतदारांच्या दरात जाऊन संपर्क, संवाद आणि संधी या नितीने प्रचार केला.ही निवडणूक विधानसभेची नव्हे तर स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक समजून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवाराचा प्रचार केला.

आकडे काय सांगतात...

  • विधानसभा निवडणूक २०१९ 
  • एकूण मतदान -२ लाख ७७ हजार ८८६
  • झालेले मतदान - २ लाख ६ हजार ५१७
  • एकूण टक्केवारी - ७४.३१%
  • विधानसभा निवडणूक २०२४

  • एकूण मतदान - २ लाख ९२ हजार ८८६
  • झालेले मतदान - २ लाख ३१ हजार ४२३
  • एकूण टक्केवारी - ८१.०२ %

वाढलेले मतदान व टक्का - २४ हजार ९०६ (४.७१%)

मोबाईलची रिंग आणि वातावरणाची झिंग...

२० नोव्हेंबरला सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यापासून दोन्हीही पक्षाचे नेते,कार्यकर्ते,पत्रकार,निवडणूक विश्लेषक परस्परांना फोन लावून तुमच्या भागातलं वातावरण काय म्हणत ? कोणता उमेदवार लिड घेणार? कोणाचा टक्का घसरणार? कोण घासून येणारं ? कोण ठासून येणार ? हे असले प्रश्न विचारून नुसत्या चौकश्या नि गप्पा टप्पांचे फड रंगत आहेत.या इलेक्शनचा निकाल काय लागणार नि कसा लागणार? हे सोडून दुसरा कुठलाच संवाद होत नाही.प्रत्येकाच्या काळजात झापुक झुपूक...झापुक झुपूक... होतय.अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.

वाढलेला टक्का आणि लाडक्या बहिणींचा धक्का कोणाला..?

गेल्या पंचवार्षिक पेक्षाही अत्यंत चुरशीने झालेल्या यंदाच्या निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का काय चमत्कार घडविणारं याकडेही सर्वांचे लक्ष आहे.महिलांनी देखील कधी नव्हे इतक्या उत्साहाने मतदान केले आहे.गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत महिला वर्गावर लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव असल्याचे जग जाहीर आहे.मग या लाडक्या बहिणी कोणत्या भावाच्या झोळीत मताचे दान टाकणार हा मुद्दा सर्वात महत्वपूर्ण ठरणार आहे.पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत प्रचंड चुरस पहावयास मिळाली तरी अतिशय शांततामय वातावरणात निवडणुक पार पडली.येथील मतदार वरवर शांत असला तरीही संयमी,सज्ञानी आणि विचारी आहे. तो कोणाच्या बाजूने कौल देणार हे उद्याचा निकालच सांगेल.

जाता जाता ....

उद्या शनिवारी दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईलच.तोपर्यंत तुम्ही एखाद्या मित्राला...,पै पाहुण्यांला...सहज एखादा कॉल करून या लोकशाहीच्या उरुसाचा आनंद घ्या.

हॅलो..ते नव्हं पाव्हणं... तुमच्या गावातलं वातावरण नेमक काय म्हणतयां...?

@ शरद जाधव

To Top