ऊस क्रांती : कोण म्हणत ऊस शेती परवडत नाही ? या बहाद्दरांन काढला एकरी १४४ मे.टन उतारा
संवाद न्यूज कुंडल प्रतिनिधी:
खताचे लागवडीचे दर वाढले, मजूरी पाणीपट्टी परवडेना, ऊसाला उत्पादन शुल्कावर आधारित दर मिळेना...त्यामुळे ऊस शेती परावडेना अशी ओरड सर्वत्र ऐकायला मिळते.पण वास्तव परिस्थितीचा बाऊ न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जिद्दीने ढवळी ता.तासगांव येथील रहिवासी व क्रांतीअग्रणी जी. डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे ऊसउत्पादक शेतकरी सहदेव यशवंत पाटील यांनी एक एकर क्षेत्रात तब्बल १४४.५९३ मे.टन इतके विक्रमी उत्पादन घेतले.
- शरद भाऊंनी केले खास अभिनंदन..
मागील वर्षीची दुष्काळी परिस्थिती व यंदा अतिवृष्टी, प्रतिकूल हवामान अशा परिस्थितीचा सामना करीत त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर,अनुभव व जिद्दीच्या जोरावर विक्रमी उत्पादन घेतले आहे. याबद्दल क्रांतीचे चेअरमन शरद भाऊ लाड यांनी त्यांचे खास अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असा पॅटर्न...
सहदेव पाटील यांचेकडे स्वतःची १५ एकर व खंडाने केलेली १० एकर अशी एकूण २५ एकर जमीन आहे. त्यांचे दरवर्षी सुमारे ८-९ एकर ऊसपीक असते. याचे एकरी सरासरी उत्पादन ९० मे. टनापेक्षा जास्त मिळते. गतवर्षी १ एकर क्षेत्रामध्ये हरभरा पिकाचे फेरपालट पिक घेऊन, आडसाली हंगामात २९ जून रोजी को-८६०३२ या जातीची ऊस लावण केली. लावणीपूर्वी नांगरट व रोटर मारून शेतात मेंढीचा कळप बसवला. त्यानंतर एकरी २ ट्रेलर शेणखत विस्कटून पुन्हा नांगरट, रोटर मारून ४.५ फुटावर सरी तयार केली. ऊस लागणीसाठी संशोधन केंद्र पाडेगांव येथील बेण्यापासून तयार केलेले प्रमाणित बेण्याचा वापर केला. लावणीपूर्वी क्लोरो, बाविस्टीन व जर्मिनेटर या औषधांची बेणेप्रक्रीया करून लावण केली. लावणीवेळी सिंगल सुपर फॉस्फेट ३, डि.ए.पी.- १, १०:२६:२६ - १, अमोनियम सल्फेट १, निंबोळी पेंड २ पोती, गंधक १० किलो व सिलिकॉन ९ किलो, असा बेसल डोस दिला. दोन महिन्यांनी बाळभरणी वेळी युरिया १, अमोनियम सल्फेट १, १०:२६:२६- १, डि.ए.पी.- १ पोती, करंज पेंड २०० किलो असा डोस दिला. तीन महिन्याने मध्यम भरणीवेळी युरिया २, अमोनियम सल्फेट २, डि.ए.पी.- २, ९:२४:२४ - २, २४:२४:० - २, मिश्र पेंड २, करंज पेंड ३०० किलो, शेंग पेंड ५०० किलो, पोटॅश २ पोती, १५ मे. टन प्रेसमड, ४ मे. टन कोंबडी खत व ६ ट्रेलर शेणखत हे सर्व खत मिसळून वापर केला. मोठ्या भरणीवेळी पुन्हा युरिया १, अमोनियम सल्फेट १, २४:२४:० -१, पोटॅश १, डि.ए.पी.- १ व सिलिकॉन या खताचा वापर केला. लागण केलेनंतर १५ दिवसाच्या अंतराने विद्राव्य खते, संजिवके, ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड च्या ५ वेळा आळवणी व ८ वेळा फवारणी केल्या आहेत. मोठ्या भरणीनंतर खताच्या दोन अतिरिक्त मात्रा त्यांनी वापरल्या आहेत. ऊसपिक १० महिन्याचे झाल्यावर वाळलेले पाचट काढून, सरीत आच्छादन केले. ऊसाची तोड ०१ ते ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत झाली, तेव्हा या ऊसाला सरासरी ४९-५० कांड्या होत्या.पाटील यांचेकडे गायी म्हैशी मिळून सुमारे २० पशुधन आहे. या पशुधनाच्या सर्व मूत्राचा वापर त्यांनी या ऊस शेतीमध्ये केला. गाळपावेळी त्यांचे शेतात सरासरी ४९ हजार ऊससंख्या व सरासरी ३ किलो प्रति वजनाचा ऊस मिळाल्यामुळे ते या विक्रमी उत्पादनापर्यंत पोहचू शकले. या विक्रमी उत्पादनापर्यंत पोहचणेसाठी त्यांचा स्वतःचा ऊस शेतीतील अनुभव व क्रांती कारखान्याचे वसगडे विभागाचे अधिकारी अजय पाटील, वैभव नवले आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.