भिलवडी-अंकलखोप दरम्यानचा राज्यमार्ग आणखी किती बळी घेणार ?
पलूस तालुक्यातील भिलवडी-माळवाडी राज्यमार्गावर असणाऱ्या सरळी पुलादरम्यान शनिवारी राज वैभव पवार या विद्यार्थ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडविले. या अपघाताने आईच्या हातातून एका निष्पाप लेकराला नियतीने हिरावून घेतले. माळवाडी, भिलवडी औदुंबर फाटा ते अंकलखोप येथील पेट्रोल पंप दरम्यानचा राज्यमार्ग हा सहा विद्यार्थी, एक शिक्षिका यांच्यासह पंधराहून अधिक निष्पाप जीवांचे बळी घेणारा मृत्युमार्ग बनला आहे. प्रशासन व्यवस्था आणि संबंधित ठेकेदाराच्या तांत्रिक चुकांमुळे या मार्गावर अजून किती बळी जाणार आहेत ?असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.
सांगली,तासगांव,इस्लामपूर,कोल्हापूर अशी दक्षिण पलूस तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या भिलवडी या मध्यवर्ती गावातून वाहनांची मोठी वर्दळ असते. माळवाडी ते अंकलखोप पेट्रोल पंप पाच किलोमीटरचा मार्ग. दरम्यान अंगणवाड्या, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, सहकरीसंस्था, बँका, पतसंस्था, हॉटेल, दवाखाने,विविध प्रकारची दुकाने सारे रस्त्याच्या दुतर्फा. साहजिकच शालेय विद्यार्थी, नागरिक, गृहिणी, ग्रामस्थ कर्मचाऱ्यांनी सदा सर्वकाळ फुलून गेलेला हा परिसर. मूळच्या अरुंद असणाऱ्या रस्त्याचे विस्तारीकरण झाले नि गजबजलेल्या परिसरातून वाहनांचे वेग वाढू लागले. छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, रहदारीच्या ठिकाणी वेगावर नियंत्रण नसणे या कारणामुळे दररोज छोटेमोठे अपघात घडत आहेत. आजपर्यंत पंधराहून अधिक निष्पाप जीवांचे बळी गेले. पहाटे व्यायामाला जाणाऱ्या नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे.
भिलवडीच्या पूर्व बाजूस असणाऱ्या जुनासरळी पूल व नवीन पूल अशी दुहेरी वाहतूक आहे. मात्र डाव्या बाजूने भिलवडी गावात प्रवेश करणे व उजव्या बाजूने माळवाडी गावच्या दिशेने जाणे. पण उंची असणारा नवीन पूल हा वाहतुकीचा मार्ग असल्याचा गैरसमज होऊन नवीन वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. भिलवडी अंकलखोप दरम्यान कृष्णा नदीवरील अरुंद असणाऱ्या पुलावर मासेमारी करणाऱ्या लोकांचा दिवसभर ठिय्या असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. अंकलखोप येथील महावितरणच्या वीज केंद्राजवळ असणारे धोकादायक वळण देखील अपघातास निमंत्रण देत आहे.
आज पर्यंतचे अपघात पाहता रस्त्याच्या एका बाजूने सुरक्षितपणे जाणाऱ्या मोटरसायकल चालकांना, पादचाऱ्यांना, व्यायामासाठी चालणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ज्ञात अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने मृत्यू अथवा गंभीर जखमी झाल्याच्या घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येते.
नागरिक म्हणतात अशी काळजी घेता येईल.
- पी. डबल्यू. डी. ने सरळी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनचालकांच्या दृष्टिक्षेपात येतील असे रस्ता दुभाजक बांधून ठळक दिसतील असे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर लावावेत.
- भिलवडी ते माळवाडी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडा असलेला फूटपाथ बांधावा.
- सर्वच शाळांच्या बाजूस शाळा असल्याच्या व वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड लावावेत.अत्यावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे बनवावेत .
- रस्त्याच्या दुतर्फा लाईटची सोय करावी.
- मुख्य रस्त्याला जोडून गावात जाण्यासाठी असणाऱ्या छोट्या रस्त्यालगत सूचना फलक, रिफ्लेक्टर व वेगमर्यादेचे बोर्ड लावणे.
- भिलवडी नदीपूलावर हौशी मच्छीमारांना कायमचा प्रतिबंध करावा.
- भिलवडी पोलिसांनी वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवून भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करून वचक निर्माण करावी.
सर्व पक्षीय नेतृत्व व नागरिकांसाठी एक विनंती. दुर्घटना घडल्यावर आपण सगळेच व्यक्त होतो, निषेध करतो. पण कोट्यवधी रुपये खर्चून विकास कामांचे डोंगर उभा करताना ती कामे तांत्रिक दृष्ट्या व्यवस्थित पूर्ण झाली आहेत की नाहीत ? निर्माण केलेल्या कामातून जनतेला फायदा होतोय की जीवघेणा त्रास सहन करावा लागतोय याचा आपण गांभीर्याने विचार करायला नको का ? या अपघातात रहदारीचे नियम बाळगून घरी जाणार...राज नावाचं चिमुकल लेकरू माऊलीचा हात सोडून कायमच देवाघरी गेल आहे...अजूनही वेळ गेली नाही...वेळीच सावध आणि जागृत होऊया..!
@शरद जाधव 9890641670