गणरायाच्या आगमनापूर्वीच धनगांवकरांनी केले ध्वनीप्रदूषणाचे विसर्जन
संवाद न्यूज भिलवडी प्रतिनिधी :
सण, उत्सव,यात्रा,जत्रा आल्या की डॉल्बी लागतोच.डॉल्बी शिवाय अंगात वार घुमत नाही,त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करण्यासाठी आजची तरुणाई मागेपुढे पाहत नाही. मात्र भिलवडी पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या धनगांव ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी एकमताने ऐतिहासिक निर्णय घेऊन गणरायाच्या आगमनापूर्वीच धनगांवकरांनी केले ध्वनीप्रदूषणाचे विसर्जन केले आहे.
धनगांव ता.पलूस हे गाव म्हणजे प्रगतशील शेतकरी, साहित्यिक, शिक्षणप्रेमी नाट्य कलावंतांचे गाव म्हणून परिचित आहे. मात्र गावकऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवा पासून गावात कायम स्वरुपी डॉल्बीवर बंदी घालून डॉल्बीमुक्त गाव अशी नवीन ओळख निर्माण केली आहे.
धनगांव मधील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वानुमते डॉल्बी मुक्तीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. उत्सवाच्या निमित्ताने वाया जाणारा पैसा व होणारे प्रदूषण टाळण्यासाठी टाकलेले पाऊल ऐतिहासिक असून भिलवडी पोलिस ठाण्याचे अंतर्गत येणाऱ्या गावापैकी डॉल्बी बंदी करणारे धनगांव हे पहिले गाव असून पोलिस खात्याच्या वतीने सर्वांचे कौतुक व अभिनंदन .- सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे
ग्रामपंचायतीच्या वतीने डॉल्बीमुक्त गाव हा ठराव घेण्यात आला. त्यास गावातील विविध तरुण मंडळे,गणेशोत्सव मंडळे यांनी सहमती दर्शवून पाठिंबा ही दिला. डॉल्बी मुळे होणारे ध्वनी प्रदुषण,बिघडत चाललेली तरुण पिढी,याचे अनुकरण करणारी लहान मुले याला कुठेतरी आळा बसावा,गावातील ग्रामस्थ महिला हृदयविकाराचे पेशंट व लहान मुलांना याचा त्रास होऊ नये यासाठी धनगांव ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले.
डॉल्बी बंदी ठरावाचे निवेदन भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना धनगाव गावचे सरपंच संदीप यादव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे, पोलीस पाटील मनीषा मोहिते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हणमंत यादव, रमेश केवळे, माजी उपसरपंच घनश्याम साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी उपाध्यक्ष अविनाश शेळके, अमित कुर्लेकर, रवींद्र साळुंखे, शैलेश साळुंखे, प्रशांत(बापू)साळुंखे,पवन सावंत, प्रज्योत साळुंके, ऋषिकेश भोसले, अक्षय साळुंखे, अनिल साळुंखे, सागर साळुंखे, सुरज मोहिते, बंडा सावंत,आदर्श साळुंखे, सुनील मोहिते सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.