प्रिय आई, बाबा..उद्याच्या भविष्यासाठी लेकरांना कष्टाची जाणीव करून द्या - भगवान पालवे ;
क्षितिज गुरुकुल मध्ये विद्यार्थी पालकांशी संवाद
भिलवडी संवाद न्यूज प्रतिनिधी:
मला जे बघायला मिळाले नाही ते माझ्या लेकरांना भोगायला मिळाव या एका विचाराने पालक मुलांचे अति लाड करीत आहेत. यातून मुले घडण्यापेक्षा बिघडण्याची धोका अधिक असतो. प्रिय आई बाबा हो..तुमच्या लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी मुलांना कष्टाची जाणीव करून द्या, त्यांच्या जडण घडणीत वेळप्रसंगी मित्र बना असे आवाहन भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले.
बुरुंगवाडी ता.पलूस येथील क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये आयोजित विद्यार्थी पालक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल(बापू) जाधव होते.कार्यवाह सौ.वनिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापुढे बोलताना भगवान पालवे म्हणाले की, विविध प्रकारची प्रसार माध्यमे, सोशल मीडियाचा वापर योग्य हेतूसाठी व गरजेपुरता करावा. मनोरंजनाच्या हेतूने बनविलेल्या एखाद्या कार्यक्रमातून चांगल्या आणि वाईट गोष्टीचे वर्गीकरण करण्याची सवय लावून घ्या. आपल्या हितासाठी योग्य असणाऱ्या बाबी चिकित्सक पद्धतीने स्वीकारा. आपले ध्येय निश्चित करून नियोजपूर्वक परिश्रम केल्यास निश्चित यश प्राप्त होईल असे बोलून त्यांनी प्रसारमाध्यमांचा वापर ,वाहतूक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि विविध कायदे याविषयी माहिती सांगितली.
पोलिसांचे समाजासाठी असणारे योगदान महत्वपूर्ण आहे, ते खऱ्या अर्थाने आपले आयडॉल असल्याचे प्रतिपादन सुनिल जाधव यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.सौ.अर्चना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका सौ.दिपाली जाधव, प्राचार्य सौ.स्वाती पाटील, पी.आर.पाटील, विनायक पाटील आदीसह शिक्षवृंद, पालक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.