कल्पनाविश्वात रमलेल्या मराठी साहित्याला वास्तवाची वाट दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम वि. स. खांडेकर यांनी केले. आपल्या लेखनातून तत्कालीन समाजातील समस्यांचा वेध त्यांनी घेतला. विशेषतः गांधी विचाराने भारावलेले आदर्शवादी जीवन त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले.
रूपककथेसारखा नवा साहित्यप्रकार मराठीमध्ये त्यांनी रूढ केला. मानवी जीवनातील वेदना आग्रहाने मांडण्याचा प्रयत्न हयातभर खांडेकरांनी केला. असे मत प्रा. विठ्ठल सदामते यांनी मांडले. ते रामानंदनगर येथील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथे वि. स. खांडेकर जयंतीनिमित्त बोलत होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'वि. स. खांडेकर जयंती' निमित्त 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमात ते बोलत होते.
आजच्या तरुण पिढीने वाचन करणे आवश्यक आहे. वाचनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतो. सोशल मीडियाचा वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकांबरोबर मैत्री करणे काळाची गरज आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ. काकासाहेब भोसले यांनी मांडले. प्रास्ताविक प्रा. दिलीप कोने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तेजस चव्हाण यांनी केले; तर आभार प्रा. प्रतिभा पुदाले यांनी मानले.
यावेळी प्राध्यापक दयानंद कोपनर, प्रा. शिवानंद भंडारे प्रा. सागर कुंडले उपस्थित होते.