Sanvad News पदवीधरांची प्रथम पसंती - अरुण(आण्णा) लाड.

पदवीधरांची प्रथम पसंती - अरुण(आण्णा) लाड.


सातारचे प्रतिसरकार म्हणजे एक तेजस्वी इतिहासाचे सुवर्णपान आहे. क्रांतिसिंह नाना पाटील ,जी. डी.(बापू )लाड,नागनाथ(आण्णा) नायकवडी अशा थोर विभूतीच्या प्रत्यक्ष लढ्याने इंग्रजांची सत्ता या पश्चिम महाराष्ट्रात खिळखिळी केली.कुठल्यातरी इंग्रज अधिकाऱ्याचा खून करुन किंवा कुठे पत्रके उधळून इंग्रज सरकार हटणार नाही. क्रांतीवीर उमाजी नाईक किंवा क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्याचे उठाव इंग्रजांनी हाणून पाडले होते. कारण असे राष्ट्रीय उठाव संपवायची यंत्रणा त्यांच्याजवळ होती. तारायंत्रे, रेल्वे ,लांब पल्ल्याच्या बंदुका आणि कवायत बंद फौजा इंग्रजाजवळ होत्या .तरीही प्रतिसरकारच्या सेनापतीनी हे नवे सरकार बनवायचे धाडस त्यावेळी केले.कारण त्यांच्याजवळ होते भारतमातेवरचे उत्कट प्रेम, इंग्रजांच्या राज्याबद्दलची खरीखुरी आणि मनस्वी चीड, आणि घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान करण्याची तयारी. या गोष्टी क्रांतिसिंह नाना पाटील , जी.डी.बापू, नागनाथअण्णा यांच्या जवळ होत्या ,म्हणून प्रतिसरकारने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात एक अभूतपूर्व लढा दिला .
डॉ. जी.डी. बापू लाड एक झुंजार व्यक्तिमत्व होते. आपल्या जवळ आलेली कोणत्याही जाती धर्माची माणसे असोत त्यांना वाऱ्यावर सोडणे ,उघडे टाकणे, हवे तसे हाताळणे, वेठीला धरणे या गोष्टी उभ्या जन्मात त्यांनी केल्या नाहीत. प्रसंग कोणताही असो सतत माणुसकी जपली. माणसातल्या सद्गुणांचा आदर त्यांनी केला .सामान्य माणसाची कदर त्यांनी केली. माणुसकीच्या विचारांचे राजकारण बापूंनी आयुष्यभर केले .बापूंच्या सारख्याच धाडसी,निडर आणि तितक्याच धीट होत्या त्यांच्या पत्नी सौ.विजयाताईलाड.स्वातंत्र्यलढ्यात ज्यांच्यावर इंग्रज पोलिसांचे पकड वॉरंट आहे ,ज्यांना पकडून देणाऱ्याला मोठे बक्षीस लावलेले आहे ,जे फरार आहेत ,इंग्रज त्यांना कधी पकडतील, फासावर चढवतील किंवा गोळ्या घालतील याचा नेम नाही, अशा मुला बरोबर कोणती मुलगी लग्न करणार ? पण एक धाडसी मुलगी तयार झाली. विजयाताई यांना बापू शी लग्नाबद्दल विचारले त्या म्हणाल्या, " वाघाशी लग्न करायचे तर वाघीण बनून राहीन. मी ही वाघिणीसारखी खंबीर आहे." आणि बापूंचे लग्न २५ मे १९४५ रोजी मध्यरात्री देशभक्तीपर गीते गाऊन ,साहित्यिक वामनराव चोरघडे ,ग.दि. माडगूळकर, भाऊसाहेब नेवाळकर, क्रांतिसिंह नाना पाटील आणि दहा हजार क्रांतीकारक यांच्या साक्षीने झाले.
सौ.विजयाताई लाड यांनी बापूंच्या खांद्याला खांदा लावून क्रांती लढ्यात सहभाग घेतला. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसात त्यांनी बापूंच्या सहाय्याने क्रांतीवीर डॉ. उत्तमराव पाटील यांच्या क्रांतिवीर पत्नी सौ.लीलाताई पाटील यांना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन येरवडा जेलमधून पळवून आणले . पुढे प्रतिसरकारच्या तुफान सेनेने महिलांची फलटण उभी केली .अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या , क्रांतिकारी आई-वडिलांच्या पोटी अरुण आण्णा लाड यांचा जन्म २९ ऑक्टोंबर १९४७रोजी झाला. जी. डी.बापू म्हणजे स्वयंभू विचार वृक्ष होते. विचारवृक्षाला पाने,फुले,फळे चांगलीच लागतात.बापूंनी माणुसकीच्या मळ्यात सतत भलेपणाचे पीक घेतले. सौ. विजयाताई म्हणजे क्रांती विरांगणा होत्याच पण त्याबरोबर गरजू महिलांच्यासाठी, अडल्या नडलेल्या भगिनीसाठी, भर उन्हात सावली होऊन प्रत्येकाचा आत्मा तृप्त करणाऱ्या विठाई होत्या. या दोघांच्या सुसंस्कारात अरुण अण्णा लहानाचे मोठे झाले.
बापूनी स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग घेतलाच पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपले काम झाले असे म्हणून मागे सरकणारे ते नव्हते .यश अपयशाचा विचार न करता, गोरगरिबांच्या कल्याणाचा लढा त्यांनी स्वीकारला होता.
राजकीय सत्ताही त्वरित फळ देणारी शक्ती आहे असे मानून ,सत्तेसाठी लांडीलबाडी करणारे आणि वारे फिरेल तशी टोपी बदलणारे आणि राजकीय सत्ता ही स्वतःच्या उत्कर्षासाठी आहे हा छुपा डाव मांडणारे बापूंचे व्यक्तिमत्व बिलकुल नव्हते. ते गरिबांचा विश्वास होते, कष्टकऱ्यांचा श्वास होते.
विवेकाची वाट न सोडता आणि कुठल्याही मोहाला बळी न पडता केवळ आणि केवळ सामान्य कष्टकऱ्यांचे हित ज्याच्यात आहे, तेच करायचे हा बापूनी आयुष्यभर सांभाळलेला धर्म होता. अरुण आण्णा  या विचारात मोठे झाले .अत्यंत कमालीचा सच्चेपणा त्यांनी सांभाळला. आपल्या हव्यासापोटी बापूंच्या तत्त्वांना मुरड घालावी लागू नये म्हणून आपले जीवनच अण्णांनी साधे ठेवले .बापूनी सामान्य लोकांच्या रास्त मागण्यांसाठी जे जे लढे उभारले ,मोर्चे काढले ,धरणे धरले ,त्या प्रत्येक लढ्यात अरुण आण्णा सहभागी झाले .त्यांनी पक्षाचे, समाजाचे ,जिल्ह्याचे,तालुक्याचे, गावचे राजकारण केले, पण त्यात हे पद मला मिळालेच पाहिजे आणि काहीही करून मी ते मिळविणारच असा अट्टाहास धरला नाही. त्यासाठी लांड्यालबाड्या करायचा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही.

" माझा शेतकरी,कष्टकरी, सामान्य माणूस यांना कमीत कमी अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण आणि पोट भरेल एवढे मिळविता येण्याजोगे काम , आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव या स्वातंत्र्यात मिळालाच पाहिजे." हे बापूंचे विचार सार्थकी लागावेत म्हणून, अरुण अण्णा ही बापूंच्या मार्गाने लढत राहिले. विचारांची लढाई त्यांनी केली.
१९५७ ते १९६२ पर्यंत बापू विधानसभेत आमदार होते.१९६२ ते १९६८पर्यंत बापू विधानपरिषदेवर आमदार होते .पण बापूंनी एक नया पैशाचीही अवास्तव कमाई केली नाही. एखाद्या गरीब ,सामान्य कुटुंबासारखे अण्णा आणि त्यांच्या घरातील लोकांनी खडतर जीवन काढले .पण बापूंना वेगळा मार्ग धरायला भाग पाडले नाही.

आण्णा बी.एससी.ऍग्री झाले .त्या काळात त्यांना सहज नोकरी प्राप्त झाली असती .बापूंनी १९७७ साली सत्येश्‍वर सहकारी पाणीपुरवठा योजना चालू केली .ती योजना कार्यान्वित करण्यासाठी अण्णांनी प्रचंड पायपीट केली .याचवेळी दुसरी पाणीस्कीम राबवून कुंभारगाव,बलवडी,घोगाव, दह्यारी,तुपारी गावच्या जमिनी पाण्याने हिरव्यागार झाल्या .अण्णा कृषी पदवीधर असल्याने त्यांनी अनेक आडीअडचणीतून कृषी सेवा केंद्र सुरू केले .ते व्यवस्थित चालवले. पण राजकीय घडामोडी,शेतकरी संघटनांचे एकत्रीकरण यामुळे सतत आर्थिक अडचणी आण्णांना सोडवाव्या लागत होत्या .पण अण्णाही बापूंचे चिरंजीव असल्याने माघार घेणे त्यांच्याही स्वभावात नव्हते.अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि अडथळ्याची प्रचंड मोठी शर्यत पार करीत अण्णांनी, बापूंच्या आशीर्वादाने ' क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखाना ' सुरु केला. आणि तो भारत देशात आदर्श साखर कारखाना म्हणून नावारूपास आणला.अण्णांनी आपली वैचारिक ताकद ,नैतिकता आणि समाजासाठी सर्व आघाडीवर लढणे हा बाणा कधीच सोडला नाही. समाजातील गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत राहणे त्यांना आवडते.

       निसर्गातील पशुपक्षी यांना मानवाने गुरुपद द्यावे , एवढी त्यांची उपजत बुद्धी असते. पक्ष्यांचे मधुर गुंजन निसर्गाला आनंद देते. मा.अरुण आण्णा अगदी असेच आहेत .प्रचंड मोठा डौलदार पिसारा असणारा पक्ष्यांचा राजा मोर ,जसा सर्वस्वाने देखना आहे ,तसे अरुण अण्णा आहेत .स्फूर्तीदाते नेतृत्व, कर्तृत्व त्यांच्याजवळ आहे. अण्णा संयमी आहेत, विवेकी आहेत ,समाजहित दक्ष आहेत. आचार, विचार, उच्चार यांनी गोरगरीब समाजाचे कुलगुरुपद भूषवावे एवढे ते स्वच्छ व पवित्र चरित्राचे आहेत .नंदादिपासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजस्वी आहे.  असे हे तेजस्वी व्यक्तीमत्व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे.पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेमध्ये हक्काने मांडण्यासाठी आज आण्णांना विधानपरिषदेमध्ये पाठविणे गरजेचेच आहे.म्हणून या लेखाच्या माध्यमातून मी पदवीधरांना विनंती करतो की येत्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणूकीत आपण  अरुण ( आण्णा )लाड यांना आपले बहुमोल मत देऊन त्यांना निवडून आणूया. आण्णांना विधानपरिषदेमध्ये पाठवूया.

लेखक - 
योगेश्वर रघुराज मेटकरी.
विटा(जि.सांगली).
To Top