Sanvad News शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन कामकाजातून मुक्त करा-बाबासाहेब लाड;प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन कामकाजातून मुक्त करा-बाबासाहेब लाड;प्राथमिक शिक्षक समितीची मागणी



सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील कोविड विलगीकरण कक्षातील रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करून आपत्ती व्यवस्थापन तसेच कोविड १९ कामकाज यातून शिक्षकांना कार्यमुक्त करावे अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब व शिक्षणाधिकारी श्री.विष्णू कांबळे साहेब यांच्याकडे केली.
            राज्यनेते किरणराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत,  शिक्षक बँकेचे संचालक तुकाराम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश नरुटे, विकास चौगुले यांच्या शिष्टमंडळाने सोमवार दिनांक १४ जून रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन १५ जून पासून सुरू होत असलेल्या नवीन शैक्षणिक वर्षातील शिक्षण प्रक्रिया सुरळीत होण्यासंबंधाने सविस्तर चर्चा केली.
             यावेळी बोलताना मुख्य शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी बोलून योग्य तो मार्ग काढू असे सांगितले. तसेच पदोन्नती प्रक्रिया तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने यावेळी शिक्षण विभागातील नूतन कक्षाधिकारी श्री. मोहन मोहिते, अधिक्षक श्री.कुबेर चौगुले, श्रीमती ज्योती पालकर, श्री.शकील लतीफ,नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी बोलताना कक्षाधिकारी श्री. मोहिते साहेब यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे साहेब उपस्थित होते.
To Top