Sanvad News ‘नातं गुरु शिष्याचं’- रुपेश पवार आणि योगेश बर्वे याचं द्वंद्व प्रदर्शन! मुंबई येथील जहांगीर कलादालनात १९ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजन.

‘नातं गुरु शिष्याचं’- रुपेश पवार आणि योगेश बर्वे याचं द्वंद्व प्रदर्शन! मुंबई येथील जहांगीर कलादालनात १९ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजन.


तथा कथित ‘पोस्ट मॉडर्न’ काळात भिन्नतेच्या बेटावर प्रत्येक व्यक्ती असतो असं कितीही आग्रहाने मांडलं जात असलं तरीही एक नातं, एक धागा प्रत्येकाला जोडत असतो. प्रत्येकाच्या नव्या विचाराची नाळ जुन्या संचीताशी जोडलेली असते. असंच काहीसं अधोरेखित करणार ‘नातं’ हे रुपेश पवार आणि योगेश बर्वे या गुरु शिष्यांच प्रदर्शनातून व्यक्त होत आहे. हे प्रदर्शन जहांगीर कलादालनात १९ ते २५ एप्रिल दरम्यान भरत आहे.बॉम्बे आर्ट सोसायटी चे अध्यक्ष राजेंद्र पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन होत आहे.


योगेशची चित्रे ही तशी पहिली तर सिटीस्केप सदरा खाली मोडणारी. शहरी भूदृष्याचा गेल्या काही दशकात अमुलाग्र बदल झाला आहे. वाडे, चाळी ह्या शहरातून गायब होत त्याजागी नव्या इमारती आणि उड्डाणपूल येत गेले. अशा काळात ‘आठवणी’तील शहराची चित्रे काढणारा एक चित्रकार वर्ग आहे. पण योगेश बर्वे यांनी शहरांचा बदलता चेहरा मोहरा चित्रित करताना नवी सौदर्य दृष्टी समोर ठेवली आहे. उड्डाणपूला खालील जुने देऊळ चित्रित करताना त्यांची ही ताकद जाणवते. तसेच शहरातील बदलते आकाश असा वेगळाच विषय त्यांच्या चित्रात दिसतो. आकाशातील इलेक्ट्रिकल केबलचे जंजाळ आणि त्यातून भासमान होणारे सर रियलीस्टिक आकाश, त्याला साजेशी रंग संगती चित्र अनुभवाला अमूर्ततेच्या मार्गाकडे नेताना दिसते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

योगेशचे गुरु रुपेश पवारांनी सुरवातीच्या काळात लँडस्केप केली होती. पण त्यातून पुढे जात रेषा हाच घटक केंद्रस्थानी ठेऊन ते अमूर्ततेच्या ‘स्व’तः च्या प्रांतात पोहचलेले दिसतात. त्यांची ही चित्रे निसर्गातील अनेक दृश्यगम्य अनुभवांच्या स्मृती जगवणारी असली तरीही चित्र निर्मितीच्या प्रक्रियेत याचे भान अथवा हेतू नसल्याने ही शुद्ध अमूर्त चित्रे आहेत.

एखादा ग्राफिक कलाकार ज्याप्रमाणे प्लेट वर प्रक्रिया करत एका दृश्यापर्यंत पोहचतो त्याच प्रमाणे रुपेश यांची चित्रे हळू हळू आकारास आलेली दिसतात. त्यांच्या चित्रात ‘एक्सप्रेशनिस्ट’ प्रमाणे आवेश नसतो तर चित्रातील घटक आपसूक उगवल्या प्रमाणे असतात. वाऱ्याच्या एका झुळूकी सरशी अथवा पाण्याच्या एका लाटे सरशी वाळूवरचे सारे आरेखन अलगद मिटून जावे आणि तेथे नवे रूप उमलून यावे आणि पाहणाऱ्याने हरखून जावे असा वरकरणी साधाच वाटणारा अनुभव रुपेश पवार यांची चित्रे देतात. पण अशी चित्रे अनुभवाताना शब्दांचे गाव मागे पडते आणि पाहणारा देखील स्व’तः च्या प्रांतात पोहचतो.
 - प्रा.डॉ. विक्रम कुलकर्णी
To Top