गावपातळीवर प्रभागात एखादा शिक्षक कर्मचारी असतो,इलेक्शन ड्युटी निभावत असताना त्याला पोस्टल मतदान करावे लागते.मतमोजणी प्रक्रियेत स्वतंत्रपणे पोस्टल मतदान जाहीर केले जात असल्याने गोपनीयतेचा भंग होतो.यामुळे कित्येक कर्मचारी पोस्टल मतदान करण्यात टाळाटाळ करीत आहेत.कृपया पोस्टल मतदान एकूण मतात मिसळून जाहीर करावे ते स्वतंत्र पणे जाहीर करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांचे निवेदन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने देण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम डिसेंबर २०२२ मधील निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, सुधाकर पाटील यांनी हे निवेदन दिले.
यामध्ये निवडणूकीनंतर निवडणुकीचे साहित्य जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागतो त्यामुळे निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभागीअसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची सोय करण्यात आलेली आहे.परंतु गावातील एका वार्डामध्ये कदाचित एकाच कर्मचाऱ्याचे पोस्टल मतदान असेल तर मतमोजणीमध्ये पोस्टाची मते वेगळी मोजल्यामुळे त्यामध्ये गोपनीयता राहत नाही. त्यामुळे अनेकदा कर्मचारी सोय असूनही आपले मत गुप्त राहत नसल्याने पोस्टल मतदान करण्याचे टाळतात. त्यामुळे पोस्टल मतदान वेगळे जाहीर करण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले की पोस्टल मतदानाच्याविषयी निवडणूक आयोगाला कळवले जाईल परंतु यावेळी खूपच अल्पकाळ राहिलेला असल्यामुळे सदरचा निर्णय होईल असे सांगता येत नाही परंतु पुढील काळासाठी त्याचा पाठपुरावा नक्की करण्यात येईल.
यावेळी शिक्षक संघाचे महादेव हेगडे, शामगोंडा पाटील, बाजीराव पाटील, दादासाहेब हजारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.