Sanvad News देश घडविण्यासाठी साने गुरुजींच्या संस्काराची गरज - डॉ.कुमार सप्तर्षी ; सुभाष कवडे यांचा साने गुरुजी संस्कार साधना पुरस्काराने गौरव

देश घडविण्यासाठी साने गुरुजींच्या संस्काराची गरज - डॉ.कुमार सप्तर्षी ; सुभाष कवडे यांचा साने गुरुजी संस्कार साधना पुरस्काराने गौरव



पुणे प्रतिनिधी
द्वेषाने समाज ऱ्हास पावतो, बंधुभाव वाढीस लागल्यास देश घडतो. शिक्षणाने  खरे परिवर्तन होते. विधायक कार्य करणारी माणसं खऱ्या अर्थाने झाडांप्रमाणे आश्वासक असतात. भिलवडीचे साने गुरुजी  संस्कार केंद्र छोट्याशा पणतीप्रमाणे देश घडविण्याचे कार्य करीत आहे. देश घडविण्यासाठी आज साने गुरुजींच्या संस्काराची गरज आहे. भिलवडी चे सामाजिक कार्यकर्ते सुभाष कवडे हे समाज घडविण्याचे कार्य करीत आहेत असे उद्गार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी पुणे येथे व्यक्त केले. साने गुरुजी संस्कार साधना पुणे या संस्थेच्या २०२३ सालच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी संस्कार साधना  पुणे या संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉक्टर दिलीप गरुड होते. 
          यावेळी व्यासपीठावर बी. आर. माडगूळकर,  सुहास पानसे, डॉ.  अलका पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भिलवडी चे साहित्यिक  व साने गुरुजी संस्कार केंद्राचे प्रमुख सुभाष कवडे यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉ. शरद जावडेकर पुणे, मनोहर कोलते पुणे,  जीवन इंगळे खटाव,दिलीप शिवाजी काशीद धुळे, डॉ. यशोदा वाकणकर पुणे  यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र  शाल श्रीफळ व रोख रक्कम असे होते. 


    पुरस्कार स्वीकारल्यानंतर  मनोगत व्यक्त करताना सुभाष कवडे म्हणाले की, गेली २५ वर्षे सार्वजनिक वाचनालय भिलवडी व साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी या माध्यमातून उत्तम माणूस घडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांमध्ये वाचन संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. सुसंस्कारित, निर्व्यसनी,संवेदनशील, विज्ञानप्रेमी व राष्ट्रप्रेमी, युवक देश समृद्ध करणार आहेत. या दृष्टीने साने गुरुजींचे संस्कार घरोघरी पोहोचविण्याचा  प्रामाणिक  प्रयत्न  केला आहे. मला मिळालेला पुरस्कार हा आईने दिलेली शाबासकी आहे. आज समाजात असंवेदनशीलता व जातीयता वाढते आहे अशा वेळी गुरुजींची श्यामची आई घरोघरी पोहोचविण्याचे काम गतीने करावे लागणार आहे. गुरुजींचा खरा तो एकची धर्म  जगाला प्रेम अर्पावे हा संदेश समाजात रुजविणे गरजेचे आहे त्यादृष्टीने संस्कार केंद्राच्या माध्यमातून अखेरपर्यंत कार्यरत राहणार आहे. एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन पुणे या सभागृहात  हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. साने गुरुजी संस्कार साधना संस्था पुणे ही संस्था गेली 22 वर्षे महाराष्ट्रातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्त्यांना गौरवीत आहे.
 संस्थेचे सचिव बी. आर. माडगूळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ॲड.संतोष मस्के यांनी केले. दत्ता चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. यावेळी साने गुरुजींच्या विचारांवर  प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. दिलीप पुराणिक, श्रीमती अरुणा हिंगणे, श्रीमती स्मिता परदेशी यांनी संयोजन केले. साने गुरुजी संस्कार साधना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार सुभाष कवडे यांना मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


To Top