अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंडळाच्या वतीने उद्या सांगली येथे 'शिक्षक साहित्य संमेलन' चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहनराव गायकवाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन संपन्न होणार असून, शिक्षण सहसंचालक नामदेव माळी, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष पदी शिक्षक साहित्यिक महेशकुमार कोष्टी व स्वागताध्यक्षपदी साहित्यिक तानाजी आसबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे, समीक्षक श्रीकांत पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, ज्येष्ठ साहित्यिक दयासागर बन्ने, कवी मुबारक उमराणी, साहित्यिक रत्नकुमार नरुले यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आहे.
संमेलनाच्या पहिल्या सत्रातील 'शिक्षण व साहित्याचे मूलतत्त्व' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विजय जंगम यांची नियुक्ती असून, प्रा. मगनलाल राजपूत, डॉ. अजित पाटील, शरद जाधव, प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांचा सहभाग आहे. द्वितीय सत्रातील 'काव्य पाखरांची शाळा' या निमंत्रितांच्या कवी संमेलन अध्यक्षपदी डॉ. विजयकुमार माने असणार आहेत.
या संमेलनामध्ये राज्यस्तरीय 'शब्द सारथी' साहित्य गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, त्यामध्ये उर्मिला तेली (उत्कृष्ट बालसाहित्य), साताप्पा सुतार (उत्कृष्ट काव्यसंग्रह), अरविंद मानकर (उत्कृष्ट कथासंग्रह), प्रतिभा जगदाळे (उत्कृष्ट कादंबरी), सविता व्हटकर (उत्कृष्ट समीक्षण ग्रंथ), सचिन कुसनाळे (उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ) यांच्या साहित्यास गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून, त्यामध्ये राहुल सूर्यवंशी (बेडग), श्रीकृष्ण माळी (कडेगाव), रमेश कोष्टी (वांगी), प्रा. पोपट पाटील (पलूस), किशोर दिपंकर (कवठेमहांकाळ), विजयकुमार उगारे (शिराळा), भाऊसाहेब यादव (जत), सुनील जगताप (वाळवा), सुनील लाड (तासगाव), विशाल कवडे (आटपाडी), सुमेध कुलकर्णी (सांगली) यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी शिक्षक, साहित्यिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.