हरिपूर प्रतिनिधी
येथील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये आज २१ जून हा 'जागतिक योग दिन' उत्साहात साजरा झाला.मुख्याध्यापक श्री. दिलीप पवार यांनी स्वागत करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल मोहिते यांनी 'योग आणि जीवन' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले , 'शारीरिक, बौद्धिक, मानसिक, विकासासाठी योग अत्यावश्यक आहे.शिकण्यातील उत्साह ,मनाची एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्याबरोबरच निरामय जीवनाची योग ही एक 'संजीवनी' आहे. त्याचबरोबर स्वभावातील आक्रमकताळेपणा, चीडचीड ,उदासीनता, नैराश्य नाहीसे करण्यासाठी ,भावनिक नियंत्रणासाठी तसेच मनशांतीसाठी योग अत्यंत लाभदायक आहे. नियमित योगाभ्यासाने आपला व्यक्तिमत्व विकास साधला जातो.'
क्रीडा व योगशिक्षिका सौ.पूजा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून शास्त्रशुद्ध योगासने प्रात्यक्षिकासह उत्तमरीत्या करून घेतली. यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. राजकुमार हेरले, राजाराम वावरे, मनीषा वड्डदेसाई, सुनील खोत, अजितकुमार कोळी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका संध्या गोंधळेकर यांनी आभार मानले.