Sanvad News कृष्णाकाठच्या शैक्षणिक क्रांतीची ज्योत- डॉ. चंद्राताई शेणोलीकर

कृष्णाकाठच्या शैक्षणिक क्रांतीची ज्योत- डॉ. चंद्राताई शेणोलीकर



१६ जुलै, भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी संस्थापिका अध्यक्षा, थोर समाजसेविका डॉ. चंद्राताई शेणोलीकर २८ वा स्मृतिदिन रविवार दि. १६ जुलै रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलात संपन्न होत आहे. तब्बल २५ वर्ष अध्यक्षा होत्या. भिलवडी परिसरात वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सन १९५० च्या दशकात त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. त्यांनी केलेले शैक्षणिक कार्याची आपणास करून देत आहे.           भिलवडी येथील तालुका मास्तर स्व. दादा मालिशा चौगुले व चाळीस प्राथमिक शिक्षक यांनी या संस्थेची स्थापना केली. भिलवडी परिसरात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होती. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी भिलवडी परिसरातील विद्यार्थ्यांना तासगांव, सांगली येथे जावे लागत होते. वाहतूकीची अपुरी साधने, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करून, चाळीस प्राथमिक शिक्षकांनी महागाई भत्ता झालेली वाढ एकत्र करून, भिलवडी परिसरात शाळा सुरू करणेचे ठरविले. भिलवडी गावात ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन, शाळा सुरू करणेचे ठरविले. दि. १९/५/१९४९ रोजी स्व. भुजंगराव बापूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची स्थापना केली. यामध्ये डॉ. शेणोलीकर यांची सभासद म्हणून निवड झाली. वैद्यकीय नोकरी करणेसाठी डॉ. शेणोलीकर भिलवडी येथील माता बाल संगोपन केंद्र कार्यरत होत्या. शाळा सुरू झाली, डॉ. शेणोलीकर यांनी १५०० रुपयांची पहिली देणगी दिली. या मधून शाळेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य खरेदी केले. सुरूवातीला तात्यासाहेब चोपडे यांच्या वाड्यात, घाटातील ओवरी मध्ये तदनंतर श्री क्षेत्र निशिदी येथे शाळा भरु लागली. विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत होती, जागा अपुरी पडू लागली. दि. ६/१/१९५० रोजी शाळेला सरकारची मान्यता मिळाली. आणि २५० रुपयांचे अनुदान देण्यात आले. गावाबाहेर गंजीखान्याची जागा ग्रामस्थांनी भिलवडी शिक्षण संस्थेस मोफत दिली. दि. ९ जून १९४९ रोजी मेजर सदाशिवराव गुणे यांच्या हस्ते इंग्रजी स्पेशल वर्गाचे उद्घाटन झाले. शाळेचे बांधकाम झाले, पैशाची कमतरता भासत होती. भिलवडी येथील समस्त गावकरी बांधव, बारा वाड्या परिसरातील ग्रामस्थांनी ५० पैशा पासून देणगी दिली. डॉ. शेणोलीकर आपला वैद्यकीय सेवा संभाळून दिवसरात्र देणगी गोळा करण्यासाठी गावात फिरत होत्या. १० खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले. भिलवडी-तासगांव रस्त्यालगत संस्थेने आर. सी. सी. बांधकाम करणेचे ठरविले.ग्रामस्थ, देणगीदार, डॉ. शेणोलीकर यांच्या वैद्यकीय व्यवसायातील हितचिंतक यांनी भरघोस मदत केली. डॉ. शेणोलीकर यांनी आरोग्य केंद्राचे सेवक यांचे मदतीने शाळा परिसरात वॄक्षांची लागवड केली. डॉक्टर या वॄक्षांची जोपासना करीत होत्या. वर्गासाठी खोल्या बांधल्या, श्रमदान केले, विहिर काढली, ग्रंथ संपदा गोळा केली व्याख्याने आयोजित केली, संस्थेची पत वाढवली, गावात सेवा भावी कार्यकर्ते निर्माण केले, भिलवडी शिक्षण संस्था राजकारणापासून अलिप्त ठेवली, गरीब निराधार मुलाना मदत केली.  भिलवडी परिसर व बारा वाडया येथील ग्रामस्थांनी भरपूर आर्थिक मदत करुन, भिलवडी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आज भिलवडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. याचे श्रेय डॉ. शेणोलीकर व समस्त भिलवडीकर ग्रामस्थ यांचे आहे. आज भिलवडी शिक्षण संस्था ७५ व्या वर्षात पर्दापण  करीत आहे. त्यानिमित्ताने विविध उपक्रमाची सुरुवात होत आहे. रविवार दि. १६ जुलै रोजी २८ व्या स्मृतिदिन संपन्न होत आहे. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांना भिलवडी शिक्षण संस्थांच्या सर्व सेवकांच्या वतीने, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. 

संकलन-संजय तावदर भिलवडी.
To Top