निवडणूक लागल्यावर छत्री सारखे उगवणारे विरोधक साडेचार वर्षे असतात तरी कुठे ? डॉ.विश्वजीत कदम यांनी डागली विरोधकांवर तोफ:कडेगावत महाविजय संकल्प सभा
कडेगाव प्रतिनिधी :
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मला महाविकास आघाडी सरकारमध्ये विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.या मतदारसंघात डॉ.पतंगराव कदम यांचा वारसा चालविताना त्यांचे अपुरे स्वप्न साकार करण्यासाठी तितक्याच क्षमतेन शासनस्तरावर काम केले.मागील पाच वर्षात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात १२०० कोटींचा निधी मंजूर करून आणला असून ३५० कोटींच्या प्रस्तावित कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद झाली आहे.निवडणूक लागल्यावर छत्री सारखे उगवणारे विरोधक साडेचार वर्षे असतात तरी कुठे ? करतात तरी काय ?याचा शोध घ्या असा सवाल उपस्थित करीत डॉ.विश्वजीत कदम यांनी विरोधकांवर तोफ डागली .
कडेगाव येथे पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघातून सोमवारी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते. आमदार डॉ.विश्वजीत कदम म्हणाले की, ४० वर्षे जुन्या भिलवडी वांगी व आजच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांनी डॉ.पतंगराव कदम यांचेवर प्रेम केलं.त्यांनी दुष्काळी लोकांच्या व्यथा पाहून ताकारी टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा केला.या योजनांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात हरितक्रांती केली.तरीही या योजनांच्या लाभक्षेत्रातील गावांमधील लाभापासून वंचित असलेले उंचावरील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठीची मंजुरी घेतली.भविष्यात लवकर हा मतदारसंघ राज्यातील एक समृद्ध मतदारसंघ होईल.
पलूस कडेगाव मतदारसंघाला कुटुंब मानून ते पुढे नेत आहेत.राज्यात सत्ताबद्दल होणे गरजेचे आहे.या बदलाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची क्षमता विश्वजित कदम यांच्यात आहे.त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी मी विश्वजित समजून काम करावे. त्यांना राज्यभर प्रचारासाठी वेळ द्यावा.असे अवाहन यावेळी खासदार विशाल पाटील यांनी केले.
यावेळी माजी आमदार मोहनराव कदम,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,मध्यप्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी,खासदार विशाल पाटील,एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड,सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम,युवा नेते डॉ.जितेश कदम,दिग्विजय कदम उपस्थित होते.
मध्यप्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी,विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख,युवा नेते डॉ.जितेंश कदम,दिग्विजय कदम,पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव,उपाध्यक्ष सुनील जगदाळे,प्रणाली पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
यांची उमेदवारी जनतेसाठी नसतेच...?
निवडणूक लागली की,मतदार संघातील दोन नेत्यांना जाग येते.तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत हे लढ्याची तयारी करतात, पण त्यांची उमेदवारी ही जनतेसाठी नसतेच. तिकिटा बरोबर पक्षाकडून बरच काही मिळत.त्यात यांचे खिसे ही मोठे आहेत अशी नक्कल डॉ.विश्वजीत कदम यांनी करताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.