विराट शक्ती प्रदर्शनाने आ. डॉ.विश्वजित कदम यांचा अर्ज दाखल;कडेगावात रेकॉर्ड ब्रेक गर्दी भव्य दुचाकी रॅली व विराट सभा
कडेगाव प्रतिनिधी
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी भव्य दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी झालेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती. कडेगाव येथील तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला.
यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या खासदार विशाल पाटील,मातोश्री विजयमाला कदम ,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,सौ.स्वप्नाली विश्वजित कदम,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड,सागरेश्वर सूतगिरणीचेअध्यक्ष शांताराम कदम,जे के बापू जाधव होते . चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवस्मारक व डॉ.पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉ.पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचे दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली.पुढे उघड्या जीपमधून आमदार डॉ.विश्वजित कदम मतदारांना आवाहन करीत होते. त्यामागेहजारो दुचाकीची रॅली होती.चिंचणी,सोनहीरा कारखाना,तडसर मार्गे रॅली कडेगाव येथे प्रांताधिकारी कार्यालय कडेगाव येथे आली.या कार्यालयातील सभागृहात जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.तेथून रॅली मोहरम चौकात आली.यावेळी मोहरम चौकात विराट जाहीर सभा झाली .या सभेलाही तुफान गर्दी जमली होती.
विश्वजित कदम आप आगे बढो...
विश्वजित कदम आप आगे बढो...हम तुम्हारे साथ है या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला.हलगीचा कडकडाट...फटाक्यांची आतषबाजी ,डोक्यावर काँग्रेसची टोपी..अन गळ्यात हाताच्या चिन्हांची पट्टी ,हवेत फडकणारे काँग्रेसचे झेंडे घेऊन विश्वजित कदम आगे बढो अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागीझाले . रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या
डोंगराई ,चौरंगीनाथ व सागरेश्वर दर्शन:
आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सकाळी डोंगराई देवीचे दर्शन घेतले .त्यानंतर सोनसळ येथील चौरंगीनाथ व उदगिरीदेवीचे दर्शन घेतले,त्यानंतर चिंचणी (हणमंतनगर) येथील जागृत देवस्थान हनुमान व सिद्धनाथाचे दर्शन घेतले.यानंतर सागरेश्वर येथे देवदर्शन घेऊन देवराष्ट्रे येथे स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.