मतदारसंघाच्या विकासासाठी आ.अरुण आण्णा व शरदभाऊं सोबत एकजुटीने काम करणार - आ. विश्वजीत कदम; क्रांती समूहाच्या वतीने कुंडल येथे अभिनंदनपर सत्कार
कुंडल प्रतिनिधी:पुरोगामी विचारधारेवर जातीयवादी शक्तीचे आक्रमण सुरू आहे.जातीवादी लोक धन शक्तीचा वापर करून सामान्य जनतेचे हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशा विघातक शक्तींपासून सामान्य माणूस वाचवायचा असेल तर सर्वांनी हातात हात घालून एकत्रित येऊन काम केलं पाहिजे.पलूस कडेगांव मतदारसंघाच्या विकासासाठी आ.अरुण लाड, शरद लाड यांच्यासोबत एकजुटीने काम करणार असल्याचे प्रतिपादन - आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी कुंडल येथे केले.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांच्या घवघवीत यशाबद्दल क्रांती समूह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने आयोजित अभिनंदनपर सत्कार प्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी कुंडल येथील क्रांती कारखान्याच्या कार्यस्थळावर डॉ.कदम यांनी क्रांतिअग्रणी स्व.डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले.आ.अरुण आण्णा लाड यांच्या हस्ते त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
यापुढे बोलताना आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले की, लोकसभे प्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र राज्यातले निकाल आश्चर्यकारक व धक्कादायक आहेत. काही वर्षांपूर्वी पुरोगामी व काँग्रेसवादी विचारसरणीच्या नेत्यांनी 'ई.व्ही.एम. हटाव, देश बचाव', अशी चळवळ उभी केली होती. कालच्या निकालावरून खरोखरच काही गोंधळ आहे का? अशी शंका येत आहे.
आमदार अरुण आण्णा लाड म्हणाले की,कालच्या निकालावरून हे असं का होतंय, याचं कोड उलगडत नाही. लोकसभेच्या पराभवावरून महायुतीने दिशा बदलली. लोकांना जे नको आहे, तिकडे नेण्याचा प्रयत्न केला. सत्ता नसली तरी आता थांबायचे नाही. जनतेची ताकद आपल्या सोबत असल्याने जनतेला सोबत घेऊन मुख्य प्रश्नासाठी लढूया.
शरद लाड म्हणाले, पलूस-कडेगावची जनता भाजपच्या फसव्या योजना व फसव्या प्रचाराला बळी पडली नाही. इथे राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्या हातात हात काम केल्याने यश मिळाले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार उपस्थित होते.