क्रांती कार्यस्थळावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह स्मृतिदिन साजरा
कुंडल प्रतिनिधी:
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखाना लि; कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक स्थळावर आ. अरुण लाड यांच्यावतीने नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यासोबतच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सुद्धा याठिकाणी संपन्न झाला.
क्रांतिसिंहांनी ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांच्या तुफानसेनेचे प्रमुख सेनानी अर्थात फिल्डमार्शल होते. जी. डी. लाड व नाना पाटील यांची जोडी देश स्वातंत्र्य कार्यात नेहमी अग्रेसर होती. आज दोन्ही महापुरुषांचे स्मारक क्रांती कारखाना कार्यस्थळावर आहेत. याठिकाणीच सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.ज्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय दिला तसेच भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला व देशाची एकूणच न्यायव्यवस्था निर्माण केली, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. संपूर्ण देशात ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन देखील आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिलीप लाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी सभासद उपस्थित होते.