Sanvad News क्रांतिअग्रणी'चे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडून 'रयत' च्या शाखेची पाहणी;शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्या रावजी विद्यालयास भेट

क्रांतिअग्रणी'चे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडून 'रयत' च्या शाखेची पाहणी;शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्या रावजी विद्यालयास भेट

'क्रांतिअग्रणी'चे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडून 'रयत' च्या शाखेची पाहणी;शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन कार्यक्रमाच्या निमित्ताने तात्या रावजी विद्यालयास भेट 


कडेगांव प्रतिनिधी:

रयत शिक्षण संस्थेचे तात्या रावजी विद्यालय, तडसर याठिकाणी शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहून क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी विद्यालय तसेच वसतिगृहाची पाहणी केली. ते सध्या रयत शिक्षण संस्थेच्या 'जनरल बॉडी सदस्य' या पदावर कार्यरत आहेत. 

शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जोड असल्याशिवाय आदर्श विद्यार्थी घडविणे अशक्य असल्यामुळे चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना उत्तमप्रकारचे संस्कार देण्याचं मोठं आव्हान आज आपल्यासमोर उभे आहे. मुलांना एखादा खेळ, कला अवगत असेल, अवांतर वाचनाची गोडी असेल, तर शिक्षकांनी त्याबद्दल मार्गदर्शन करावे. त्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधांचा पुरवठा संस्थेच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. सुसज्ज वर्ग, क्रीडांगण, ग्रंथालय, वसतिगृह, स्वच्छतागृह यांमध्ये कसलीही कमतरता नसावी. अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालक यांचा कल अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी जास्त असून देखील पालक मराठी शाळेकडे पाठ फिरवून इंग्रजी माध्यमांमध्ये आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी धडपड करत असतात. पालकांनी एकमेकांसोबत लावलेली ही स्पर्धा एक व्यवसाय बनला आहे, असेच म्हणावे लागेल. ग्रामीण भागातील या मराठी शाळांना जुने सोनेरी दिवस पुन्हा परत आणायचे असतील, तर आपण सर्वांनी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने शालेय प्रशासन हाताळण्याची गरज आहे. कोणतीही शाळा ही तिथले शिक्षण आणि शिक्षक यांच्यामुळेच नावारूपाला येते आणि म्हणून त्याप्रमाणे आपण सर्वजण प्रयत्नशील राहाल, याची मला खात्री आहे, असे मत शरद लाड यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेने राज्यभरात अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. आमच्या विद्यालायकडून देखील तोच प्रयत्न नेहमी राहिला आहे. तात्या रावजी विद्यालयाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण काही प्रमाणात पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बागल यांनी दिली. विद्यालयाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. शाळेच्या वर्ग खोल्यांत तसेच मुलांच्या वसतिगृहात स्वच्छता आणि टापटीप यावर अधिक भर दिला जातो, असे यावेळी बोलताना ते म्हणाले. शाळेला आवार भिंतींची गरज असून ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शिक्षकांनी केली.सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




To Top