कुंडलमधील शिवस्मारकाचे काम एकजुटीने पूर्ण करूयात- शरद लाड; शरद लाड प्रतिष्ठानची शिवजन्मोत्सव नियोजन बैठक
कुंडल प्रतिनिधी:
शरद लाड युवा प्रतिष्ठान, पलूस-कडेगाव यांच्यावतीने कुंडल येथे २०१५ पासून प्रत्येक वर्षी १९ फेब्रुवारीला गावाच्या मध्यावर असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करून मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. हजारो शिवप्रेमी यामध्ये आपला सहभाग नोंदवतात, वेगवेगळ्या गडकिल्यांवरून शिवज्योत आणली जाते, भक्तिभावाने तिची पूजा केली जाते. सायंकाळी क्रांती महिला प्रतिष्ठानकडून बाळ शिवाजींचा स्वालिखित पाळणा गायनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. दुसऱ्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात येते.
सालाबादप्रमाणे याही वर्षी येऊ घातलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मागील शुक्रवारी सर्व सदस्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यंदाच्या ११ व्या वर्षी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचा मानस इथल्या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी केला आहे.
क्रांती कारखान्याच्या आर्थिक सहाय्यातून स्मारकाचे काम पूर्ण करणे शक्य असले, तरी लोकवर्गणीतून हे काम पूर्ण झाल्यास प्रत्येक शिवभक्ताला आत्मिक समाधान लाभेल. आणि म्हणूनच प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावावा. तसेच दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या शिवजयंतीला मोठा आर्थिक खर्च करण्यात येतो. परंतु मागील वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या गावातील शिवस्मरकाचे अपूर्ण काम जोपर्यंत पूर्ण होत नाही; तोपर्यंत आपली ही शिवजयंती थोडीशी लहान स्वरूपात साजरी करून सर्वांनी एकजुटीने उर्वरित शिवस्मरकाचे काम पूर्ण करूयात व पुढच्या वर्षीची शिवजयंती याच शिवस्मरकासमोर मोठ्या दिमाखात साजरी करू, असे मत क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने या निर्णयाचे स्वागत केले.
स्मारकासाठी लागणाऱ्या कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी शरद लाड प्रयत्नशील राहिले आहेत. कुंडल ग्रामपंचायतच्यावतीने देखील यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून येत्या सहा महिन्यात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारक उभे राहील, अशी खात्री गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने व्यक्त केली गेली.या बैठकीस शरद लाड यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.