Sanvad News क्रांती कारखाना कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी भिमराव महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण

क्रांती कारखाना कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी भिमराव महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण

 क्रांती कारखाना कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी भिमराव महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण


कुंडल प्रतिनिधी:

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखाना, लि; कुंडल येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व क्रांती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भिमराव चंद्रु महिंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना एकच भावना मनामध्ये येते की, एकेकाळी विश्वगुरु असलेला भारत व भारतीय एकजूट होऊन कुठलेही कार्य पार पाडू शकतात. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या समोर नतमस्तक देखील करू शकतात आणि याचाच परिणाम हा आहे की, आज ७६ वर्षानंतरही आपला देश प्रजासत्ताक आहे व आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो. असं असलं तरी, आपण आपल्या वैयक्तिक जीवनात करत असलेल्या कामाप्रती कितपत प्रामाणिक व घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो, हे महत्त्वाचे आहे. आज आपल्यालोकशाही भारतातील अनेक निवडणुकांमध्ये आपणाला असणारा मतदानाचा हक्क केवळ ६०% लोक पार पाडतात आणि त्यापैकी २०-३०% जनाधार मिळवणारा लोकप्रतिनिधी आपले नेतृत्व करतो, ही बाब तशी क्लेशदायक आहे. आपण या देशाचे जागरूक नागरिक म्हणून संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य तो वापर करत असताना आपल्या कर्तव्यांशी सुद्धा प्रामाणिक असायला हवं, असे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.

यावेळी 'क्रांतिअग्रणी'चे अध्यक्ष शरद लाड उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, कोणतेही राष्ट्र स्वतः महान नसते; त्या राष्ट्रामध्ये राहणारे लोक, त्यांचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची इच्छा, सत्यनिष्ठा आणि नैतिकता इत्यादि गोष्टी देशाला महान बनवत असतात. स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशाने बऱ्याच संकटाचा सामना केला, परंतु आजही अनेक तरुण बेरोजगारीशी झुंज देताना पाहायला मिळतात. त्यासाठी सहकार क्षेत्रात काम करणारे आपण सर्वजण कर्तव्यदक्षपणे आपले दैनंदिन काम पार पाडून या क्षेत्राला नवी उभारी आणण्यास प्रयत्नशील राहण्याचा निश्चय या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करूयात.सदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

To Top