तुम्ही केलेलं रक्तदान एखाद्याचे प्राण वाचवू शकते,त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व - शरद लाड'क्रांती' कार्यस्थळावर रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद
कुंडल प्रतिनिधी:क्रांती चॅरीटेबल ट्रस्ट व शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव यांच्यामार्फत क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल कार्यास्थळावर ‘रक्तदान शिबीर’ घेण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. दुपारी ३ वाजेपर्यंत १८७ लोकांनी रक्तदान केले.
अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही. महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात. मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मि.ली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण वाढायला हवे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे संचालक वैभव पवार, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सेक्रेटरी वीरेंद्र देशमुख, शरद आत्मनिर्भर अभियानाचे उपाध्यक्ष दिपक मदने, संचालक विनायक महाडीक, सुरेश शिंगटे, कुंडल ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, शंकर पवार, तडसरचे ग्रामपंचायत सदस्य विराज पवार, विनोद पानबुडे, सचिव प्रदीप विभूते, सुनिल एडके तसेच जिल्हा परिषद गटाचे विभागीय संघटक, कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी वर्ग उपस्थित होता.