कुंडल प्रतिनिधी:
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अनुसुचित जाती उपयोजना कार्यक्रमाअंतर्गत अनुसुचित जाती वर्गातील अल्पभुधारक शेतक-यांचे एकदिवसीय प्रशिक्षण तसेच या शेतक-यांना बॅटरीवर चालणारे फवारणी पंप व अनुषंगिक साहित्याचे किट वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगर यांचेमार्फत आयोजित करणेत आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरूण लाड, चेअरमन शरद लाड, प्रवरानगर जैविक नियंत्रण केंद्राचे प्रभारी व शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, संचालक जितेंद्र पाटील, सुकुमार पाटील, विजय पाटील, दिलीप थोरबोले, अनिल पवार, बाळकृष्ण दिवाणजी, संजय पवार, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, सचिव विरेंद्र देशमुख, माजी संचालक कुंडलिक थोरात, माणिक गोतपागर, अविनाश कारंडे, वैभव गोतपागर, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊसविकास अधिकारी विलास जाधव तसेच या योजनेतील १०० लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अरूण (अण्णा) लाड म्हणाले की, "अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व किटकनाशके याचा बेसुमार वापर वाढला आहे. शेतीतील उत्पादन वाढले असले तरी रासायनिक निविष्ठांमुळे निसर्ग साखळी विस्कळीत झाली आहे, नैसर्गिक किड नियंत्रण कमी झाले आहे. शेतीचा पोत सुधारणेसाठी जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगर यांनी विकसित केलेल्या जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना अमलात आणणे आवश्यक बनले आहे.
डॉ. ज्ञानेश्वर बोरसे म्हणाले की, "अनुसुचित जाती वर्गातील अल्पभुधारक शेतकरी व दारिद्र्य रेषेखालील असंघटित घटक यांच्या भौतिक व आर्थिक विकासासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या अनुषंगाने कारखाना परिसरातील शेतक-यांना मदत करून, ऊस उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणेच्या हेतूने सदरचा कार्यक्रम आयोजित केला आहे" यावेळी डॉ. योगेश थोरात यांनी ऊसपिकावर येणा-या किडी व त्याच्या नियंत्रणासाठी संशोधन केंद्रामार्फत विकसित केलेले जैविक नियंत्रणाचे उपाय या विषयी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले तर संचालक संग्राम जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.