अभिनेते आनंद हाबळे यांना कोल्हापूर फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट खलनायक पुरस्कार
कोल्हापूर प्रतिनिधी :
आष्टा येथील सुप्रसिद्ध कवी, निवेदक,अभिनेते आनंद हाबळे यांना भगवान क्रिएशन प्रेझेंट महादेव साळोखे आयोजित कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2024 या समारंभात महेश बनसोडे निर्मित 'चल हल्लाबोल' या चित्रपटातील सरपंच खलनायक या भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायक अवार्ड सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नरेंद्र पंडित, चित्रपट निर्माते व अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे महासचिव महेश बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आनंद हाबळे यांनी व्यसनमुक्ती वर आधारित 'अरे संसार संसार' या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी केले असून त्यामधून त्यांनी हृदय शस्त्रक्रिया निधी, शैक्षणिक निधी,उपलब्ध करून दिला. तसेच व्यसनमुक्ती, दारूबंदी, हुंडाबळी, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, एड्स, साक्षरता, महिला बचत गट जनजागृती कार्यक्रम,असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या हागणदारी मुक्त गाव, शालेय स्वच्छता अभियान, हॉटेल मॅनेजमेंट या विषयावर फिल्म बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांच्या यशोगाथा 'निर्भीड साऱ्या बना ग' या रेडिओ मालिकेच्या माध्यमातून काम केले असून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अकरा दिवसात एक लाख लोकांना व्यसनमुक्तीची व बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्याचा संकल्प पूर्ण केला. व्यसनमुक्ती वरील 'अरे संसार संसार' या कलाकृतीसाठी शासनाने व्यसनमुक्त पुरस्कार देऊन गौरव केला. सन 1987 पासून कोल्हापुरातील नामांकित कलापथक संस्थांच्या माध्यमातून कलाकार म्हणून रंगभूमीवर कलाकार म्हणून काम करीत आहेत.
टी.व्ही.वरील आभाळाची माया, जीव माझा गुंतला, संत गजानन शेगावीचे, सुंदरी अशा मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या तसेच प्रेमाची दुनियादारी, बिट्टू भैया, या वेब सिरीज व बाटली, जात , वणवा अशा अनेक लघुपटात काम केले आहे. महेश बनसोडे यांच्या 'चल हल्लाबोल' या चित्रपटात सरपंच ही खलनायकाची भूमिका साकारली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी 'चल हल्लाबोल' या चित्रपटाचे सहनिर्माते नंदकुमार पाटील, अभिनेत्री सोहा, अभी धोत्रे,नाना म्हेत्रे, राकेश कांबळे, रमाकांत पवार, अक्षय जावीर, अदी चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.