दिवाळी सुट्टीतील मातृभूमी परिचय शिबीराची सांगता..
कै. बाबूराव जोशी गुरुकुल अकॅडमी रत्नागिरी मधील विद्यार्थ्यांनी पलूस आणि परिसरातील विविध गावांना भेट देऊन गावभेटीचा आंनद घेतला.
पलूस येथील पं.विष्णू दिगंबर पलूस्कर माध्यमिक विद्यालयात रत्नागिरी येथील कै. बाबुराव जोशी गुरुकुल अकॅडमीचे ५०विद्यार्थी मातृभूमी परिचय शिबीरासाठी आलेले होते. सांगलीचे गणपती मंदीर, नरसोबावाडी येथील श्री दत्त मंदीर,खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदीर, कमळभैरवी ट्रेकिंग,सागरेश्वर अभयारण्य,बलवडी येथील क्रांती स्मृतीवन,वाझर येथील बंधारा,श्रीक्षेत्रऔदुंबर,चितळे दूध डेअरी,पलूस औद्योगिक वसाहतीतील कारखाने आदी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली. शिबीराच्या शेवटच्या दिवशी पलूस गावातील विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या. सुरुवातीला पलूस गावचे ग्रामदैवत धोंडीराज महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर पलूस गावातील हुतात्मा स्मारकास भेट दिला. हुतात्मा धर्मा वडार यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदानाबद्दल माहीती घेतली. पलूस गावचे ऐतिहासिक तळे,पलूस गावाच्या विकासामध्ये पलूस सहकारी बँक,नगर परिषद, महादेव मंदिर, गावभागातील पंडित विष्णू दिगंबर चौक , हनुमान मंदिर, परांजपेवाडा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली.
सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी पलूस गावचे दानशूर श्रीमंत आदरणीय कै. माधवराव परांजपे ऊर्फ आण्णा यांनी या वाडयाची निर्मिती केली होती. स्वातंत्र्याच्या अगोदर याच वाड्यातून गोरगरिब जनतेला सर्व प्रकारची मदत केली जात होती ती परंपरा आजहा सुरू आहे..पूर्वी पलूस गावात पाणी पुरवठयाची योजना नव्हती तेंव्हा आण्णांनी ठिकठिकाणी पाण्यासाठी स्वखर्चातून विहिरी व आड याची निर्मीती करून जनतेसाठी पाण्याची सोय केली होती.आजहि कांहि ठिकाणी या विहरी ,आड त्यांच्या दातृत्वाची साक्ष देत आहेत. पूर्वी पलूस गावाला कुस्तीची मोठी परंपरा होती.अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या पलूस गावाने पाहिलेल्या आहेत.या कुस्ती साठी आण्णांनी स्वताची जागा दिलेली आहे.सध्याच्या बाजार मैदानाच्या बाजूस असणारी इमारत त्यांचीच पलूस येथील अनेक नामवंत विदयालयाची सुरवात याच इमारतीतून झालेली आहे. आण्णांनी स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीकारकांना आपल्या वाडयात जोखिम पत्करून लपण्यास जागा दिलेली होती.तसेच सर्व प्रकारची मदत केलेली होती.आज त्यांचा वारसा त्यांचे नातू व पं.विष्णू दिगंबर पलूसकर बहु.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय उदय परांजपे साहेब चालवत आहेत.शिक्षण संस्थेची स्थापना करून संस्थेमार्फत लहान गटापासून कॉलेजपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली आहे.आज या विदयालयातून शिक्षण घेतलेले अनेक विदयार्थी परदेशात आपले करीअर करत आहेत.
वाडयात छोटासा कार्यक्रम झाला या प्रसंगी साहेबांच्या मातोश्री,संस्थेचे संचालक संजय दादा परांजपे,संचालक शंतनु परांजपे व सर्व कुटूंबीय उपस्थित होते.संजय दादा यांचे चिरंजीव मंदार यांनी सर्व विदयार्थ्यांना खाऊ व पेनचे वाटप केले.या सर्व माहितीने विदयार्थ्यासह सर्व शिक्षक भारावले.समारोपचा कार्यक्रम विद्यालयातील कै.प्रभाकर परांजपे सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमास संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा साहेब,उपाध्यक्ष सुनिल रावळ तात्या,संचालक शंतनु परांजपे ,विश्वास रावळ,संजय परांजपे, माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे उपस्थित होते.
गेली सहा दिवस विदयार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करताना आपूलकिचे ,जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.एका शिक्षकाला याहून मोठे काय असते? त्यांच्या सोबत आलेले वासुदेव परांजपे सर सौ कशाळकर मॅडम यांनी शिबीराचे नेटके नियोजन केले.होते.कुटूंबापासुन दूर राहूनही मुले शिबीरात रमली होती.आम्हा सर्वांना त्यांनी रत्नागिरी भेटीचे निमंत्रण अंतकरणापासून दिले. एस. टी.तून या सर्वांचा निरोप घेताना माझ्यासह सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
शब्दांकन-
बाळासाहेब चोपडे.
सह.शिक्षक पं. विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विदयालय,पलूस.जि. सांगली.