Sanvad News ग्रामीण भागातील तरूणाईने गिरविले उद्योगाचे धडे; रामानंदनगर महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

ग्रामीण भागातील तरूणाईने गिरविले उद्योगाचे धडे; रामानंदनगर महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

रयत शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना युवा उर्जा मेळाव्यातून व्यवसाय, उद्योग उभारताना येणाऱ्या अडचणींची जाणीव जागृती करून देत त्यावरील उपययोजनांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.  एस.डी. हेळकर यांनी केले.ते रामानंदनगर येथील आर्टस सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये आयोजित युवा उर्जा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.डी. कदम यांच्यासह उपप्राचार्य डॉ व्ही.बी.पाटील, प्रा.काकासाहेब भोसले, प्रा. संजय पाटील, ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ.नमिता पाटील,प्रा.ए. बी.माने यांच्यासह  प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी प्राचार्य डॉ. एस.डी. हेळकर पुढे म्हणाले,
शेतीच्या तुकडीकरण विभक्तीकरणाने पुढचा चरितार्थ शेतीवर चालणे अशक्य आहे. त्यामुळे इतर चरितार्थांची साधने शोधणे गरजेचे आहे. शासन त्यासाठी वेग वेगळे उपक्रम राबविते आपण त्याची माहिती घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्यालीन जीवनात ज्या अत्यावश्यक गोष्टी या महाविद्यालयीन स्तरावर राबवल्या जात आहेत. आता जे विद्यार्थी पदवी घेऊन पुढे जाणार आहेत त्यांना पुर्वी सारखी शिक्षण झालं नोकरी मिळाली अशी परिस्थिती नाही. मुलांना आता नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोय. चरितार्थासाठी काही उद्योग करायचा तर त्या उद्योगाचे ज्ञान घ्यायला पाहिजे. तो उद्योग उभारणी करण्यासाठी संघर्ष करायला पाहिजे. तेव्हा या स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल, भविष्यात आपलं अस्तित्व निर्माण करायचे असेल, तर पुस्तकी शिक्षणा बरोबरच अशा पद्धतीचे औद्योगिक आणि व्यवसायीक शिक्षण, आणि त्यांच्या प्रत्यक्ष आपल्या कुटुंबाला आणि समाजासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे ही शिक्षण मिळणे गरजेचे आहे.

                  यावेळी रामानंदनगर महाविद्यालयाचे  प्राचार्य कदम म्हणाले, शोध , नावीन्य, स्टार्ट अप या संकल्पना विद्यार्थ्यांना समजाव्या त्याचे प्रात्यक्षिक घेऊन मुलांना व्यावसायाभिमुख करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी  या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  मेळाव्यामध्ये सर्व विभागांच्या वतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध साधने, खाद्यपदार्थ, पोस्टर, तसेच दुर्मिळ  वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या युवा उर्जा मेळाव्यास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य जे.के.बापू जाधव, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी शुभेच्छा दिल्या.

To Top