भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी चे बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे "दारू नको दूध प्या" अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. गेली पंधरा वर्षे महाविद्यालय हा अभिनव उपक्रम राबविला आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राहुल मोरे (मनोतेज व्यसनमुक्ती केंद्र , इस्लामपूर ) तर अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुनील वाळवेकर (संचालक, भिलवडी शिक्षण संस्था ) हे उपस्थित होते. यावेळी भिलवडी गावातून व्यसनमुक्ती प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते या रॅलीचा प्रारंभ झाला. या रॅलीचा समारोप मारुती मंदिर परिसरामध्ये प्रबोधन सभेमध्ये झाले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर राहुल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,३१ डिसेंबर साजरा करण्याचे फॅड अलीकडे आलेले आहे. अशावेळी तरूण मंडळी व्यसनांचा आस्वाद घेतात आणि पुढे व्यसनी बनून स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करतात. तरुणांनी दारूच्या पहिल्या पेगला नकार किंवा नाही म्हणायला शिकले पाहिजे. दारू, तंबाखू , ड्रग्ज, सिगारेट यासारख्या व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम डॉक्टर मोरे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. व्यसनामुळे शारीरिक -मानसिक आजारांबरोबरच नपुसंकता, ताणतनाव , कौटुंबिक कलह इतकेच नव्हे तर अपघाताचे प्रमाणही वाढते आहे. तेव्हा तरुणानी कोणत्याही व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनिल वाळवेकर यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनापासून दूर रहावे तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन करावे .
या कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त जे.बी. चौगुले,संस्थेचे संचालक प्रा.डी. एस पाटील, जयंत केळकर, डी.के. किणीकर, प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस. बी. चव्हाण, भिलवडी चे उपसरपंच मन्सूर मुल्ला या मान्यवरांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्ग विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. एस. एस. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.विजय गाडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सीमा खुबीकर हिने केले, तर शेवटी आभार प्रा. विश्वास यादव यांनी मानले.