Sanvad News शालेय विद्यार्थ्यांची खेळाच्या मैदानाकडे पाठ..?

शालेय विद्यार्थ्यांची खेळाच्या मैदानाकडे पाठ..?


              डिसेंबर,जानेवारी महिना सुरू झाला की शाळा-शाळां क्रीडा महोत्सवाची लगभग सुरू होते.क्रीडा महोत्सव म्हणजे आनंदाची उत्साहाची पर्वणीच.पण हल्ली क्रीडामहोत्सवात भाग घेण्यापेक्षाही तीनचार दिवस दांड्या मारून घरात बसण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढला असल्याचे चित्र कमी अधिक फरकाने सर्वच शाळांमध्ये दिसत आहे.शालेय विद्यार्थी मैदानाकडे पाठ का फिरवीत आहेत याच कोड काही उलगडत नाही.
       नेहमी क्रीडांगणावर खेळाणारे विद्यार्थ्यांचा प्रत्येक खेळप्रकारात सहभाग असतोच.पण खेळाच्या सामन्यासाठी तीनचार दिवस वाया घालविण्यापेक्षा घरात बसून अभ्यास कर म्हणणाऱ्या पालकांची संख्या काही कमी नाही.स्पर्धा आली की हारजीत आलीच. यामधून परस्परांना खुन्नस देणे,चिडविणे,यातून किरकोळ होणारे वाद यामध्ये आपली मुलं पडली तर ती बिघडणार तर नाही म्हणून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची उदासीनता आहे. शाळेच्या क्रीडा सामन्याच्या वेळी मुलांनी अंगावर स्पोर्ट्स ड्रेस परिधान करणे योग्यच पण हल्ली त्यालाही विकृत स्वरूप प्राप्त झालेल आहे.एका शाळेच्या युनिफॉर्मचा किंवा स्पोर्ट्स ड्रेसचा एकच रंग असायचा पण हल्ली विद्यार्थी गटानुसार रंग बदलू लागलेत त्याही पेक्षा भयंकर म्हणजे त्यावर लिहिलेला मजकूर..
"नाद करायचा न्हाय".."बघतोस काय रागानं..",
"अंगावर आला तर शिंगावर घेऊ".."रावण भक्त"..."खुन्नस ग्रुप"..,"बघतोय काय रागानं..सामना जिंकला वाघांन".."दम असेल नादाला लाग".."आडवा आलास तर बघून घेईन.."ही काही उदाहरणे आहेत याहीपेक्षा डेंजर मॅटर छापला जातोय.
                   खेळामधून सहकार्य वृत्ती वाढण्यापेक्षाही जिरवाजीरवीची,खुन्नस देण्याची एकमेकांचे उट्टे काढण्याची वृत्ती फोफावत आहे.सामन्याच्या निकलापेक्षाही मुलांच्या गटातील भांडणे सोडविण्यात शिक्षकांचा वेळ अधिक जातो.
त्यामुळे हे सामने म्हणजे वर्षातील एक डोकेदुखी अशी मानसिकता शिक्षक वर्गाची झाली आहे.तो एक शालेय उपक्रम पार पाडायचा नि रिकाम व्हायचं बस्स..अगदी चार चार हजार पट असणाऱ्या माध्यमिक शाळेत शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत ५० विद्यार्थी सहभागी होत नाहीत.मुलांच्या गटातील अवस्था जरा बरी तरी आहे पण खेळामध्ये मुलींची सहभाग नगण्यच.
                      एका शाळेतील मुख्याध्यापिका म्हणाल्या की,मुलींची ज्या त्या वयात उंची वाढण्याचे प्रमाणही कमी होतं आहे.पालकांची खेळाच्या तासाचाही वेळ वाया न घालविता अभ्यास करून घ्या, अशी मागणी होते.मुलं खेळत नाहीत..शरीराचा व्यायाम होत नाही परिणामी पोटभरून जेवण नाही. सतत टी.व्ही., मोबाईल वर रमणारी मुलं शाळेत काय घरातही खेळासाठी नापसंती व्यक्त करतात.त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होणार कसा. त्या शाळेने शेवटचा एक तास मुलांना मैदानावर खेळायला सोडले.मुलांना जो खेळ खेळायचा आहे तो त्यांनी खेळावा.. मुलं मैदानावर घाम येईपर्यंत मनसोक्त खेळू लागली..घरी पोटभरून जेवू लागली..शाळेत आणलेला डबा ही पूर्णपणे खाऊ लागली.अभ्यासात ही चांगलीच रमू लागली.
                       एका सेवाजेष्ठ क्रीडा शिक्षकांची नुकतीच भेट झाली.ते सांगू लागले,खेळाचं मैदान आम्हाला परमेश्वराच्या मंदिराइतक पवित्र..चप्पल बूट पायातून बाहेर काढून पाया पडून मगच आम्ही मैदानात जातो.आता सारं चित्र बदलतय..खेळांवर मनापासून श्रद्धा असल्याचे चित्र विरळ होत चाललंय. खेळाच्या तासाला मुले मोकळी सोडून दिल्यावर केवळ गप्पांचे फड रंगतात.मुले खेळात रंगली तर अभ्यासात अधोगती होईल अशी अंधश्रद्धा शिक्षक, पालक व शाळामध्ये निर्माण झाली आहे.भाषा,गणित,विज्ञान आदी विषयाप्रमाणे जर कला,कार्यानुभव,खेळ या विषयांना शंभर गुण असतील तर मग त्यासाठी वेळ देणे गरजेचे नाही का?शिक्षण संस्था,शाळांनी मैदानाची सोय करणे,नियोजनाप्रमाणे शारीरिक शिक्षणाचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे.लोप पावणाऱ्या जुन्या पारंपारिक खेळांची नव्याने ओळख करून द्यावी लागेल.शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ठ केलेल्या खेळप्रकारांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडावी लागेल.याच जोडीने शासनाने प्रत्येक शाळेत पूर्णवेळ क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देणे गरजेची बाब आहे.यासाठी समाज,शाळा,शिक्षक, बालक व पालक यांच्यामधून उठाव होणं गरजेचं आहे.कदाचित असे झाले तर..दिवसेंदिवस ओस पडणारी मैदाने खेळाडूंच्या गर्दीने फुलतील यात तिळमात्रही शंका नाही..!
तुमचाच
आनंद....!
info.eschooltimes@gmail.com
To Top