तासगाव / प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसालच्या जीवनातील हास्य लोप पावले आहे. हसण्याने माणसाचे आयुष्य वाढते. सुखी जीवन जगायचे असेल तर माणसाने मनमुरादपणे हसले पाहिजे. असे प्रतिपादन विनोदी कथाकार शरद जाधव यांनी केले.
प्रतिष्ठा फौंडेशन व पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव यांच्यावतीने आयोजित चौथ्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात दुसर्या कथकथन सदरात ‘हास्ययात्रा’ हा कार्यक्रम त्यांनी सादर केला त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या विनोदाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
तासगाव येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे साहित्यनगरी येथे सोमवारी चौथे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या दुसर्या सत्रात शरद जाधव यांच्या विनोदाने रसिकांची प्रचंड हसवणूक केली. त्यांनी अनेक किस्से सांगून जीवन कसे हसतहसत जगायचे असते हे पटवून सांगितले.
शरद जाधव म्हणाले, माणसं एवढी व्यस्त झाली आहेत की त्यांना आपल्या स्वत:कडेही लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे आयुष्य कमी झाले आहे. अनेक व्याधींनी माणसं त्रस्त झाली आहेत. यासगळ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर प्रत्येकाने जीवन हसत हसत जगले पाहिजे. हसण्याने माणसाचे आयुष्य वाढते असते म्हणून माणसाने मनमुरादपणे हसले पाहिजे.