Sanvad News महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये दिवसातून तिनदां वाजणार वॉटर बेल;विद्यार्थ्यांनी प्रतिदिनी दीड-दोन लिटर पाणी पिणे गरजेचे

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये दिवसातून तिनदां वाजणार वॉटर बेल;विद्यार्थ्यांनी प्रतिदिनी दीड-दोन लिटर पाणी पिणे गरजेचे

   शाळा भरण्यासाठी, तास बदलण्यासाठी किंवा शाळा सुटण्यासाठी शाळांमध्ये वाजलेली बेल आपल्या ऐकिवात आहे.पण या वेळेव्यतिरिक्त दिवसांतून तीन वेळा शाळेत वॉटर बेल वाजणार आहे.ही बेल वाजवून शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठीची सूचना दिली जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमध्ये वॉटर बेल(पाणी पिण्याची सूचना) हा उपक्रम राबविण्या बाबत आदेश लागू केला आहे.
  राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे.शरीरात आवश्यक तेवढे पाणी न पिल्याने विविध प्रकारांच्या आजारांचा धोका असतो.मुलांनी प्रतिदिनी किमान दीड ते दोन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.वय,उंची आणि वजनानुसार हे प्रमाण बदलत असते.कित्येक मुलं शाळेत नेलेली पाण्याची बाटली तशीच घरी परत आणतात.पाणी कमी पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे(Dehydration),थकवा येणे,मूत्रमार्गात संसर्ग होणे,मुतखडा(किडनी स्टोन) होणे,चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते.
       शाळेची मुले अभ्यासाच्या व खेळण्याच्या नादात पाणी पिणेच विसरून जातात.तेव्हा मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शालेय कामकाजाच्या दरम्यान दिवसातून तीन वेळा वॉटर वाजविण्यात येणार आहे.याबाबत शालेय वेळापत्रकात मुख्याध्यापक वेळापत्रकात तीन वेळा घंटा वाजविण्याबाबतच्या वेळा निश्चित करतील.या राखीव वेळेत मुले आवश्यकतेनुसार पाणी पितील. त्यांना पाणी पिण्याची मानसिकता निर्माण होऊन तशी सवय लागत जाईल.सदर कालावधीत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याबाबत मुभा देण्यात यावी.वॉटर बेल हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविणे अनिवार्य असून याबाबत शिक्षण आयुक्त सर्व शाळांकडून अहवाल घेणार आहेत.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी हे शासन परिपत्रक जारी केले आहे.


To Top