Sanvad News वेगळ्या वाटेने जाताना.... लेखक : अभय शरद देवरे,सातारा.

वेगळ्या वाटेने जाताना.... लेखक : अभय शरद देवरे,सातारा.


तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण मराठी माध्यमात झालेले. दहावीला 81% गुण मिळूनसुद्धा शास्त्र शाखेकडे न जाता तिने कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला तिच्या माता-पित्यांनी जोरदार पाठिंबा दिला. अकरावी-बारावीत सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पुन्हा मराठी माध्यमच! बारावीतही कला शाखा असून 78 टक्के मिळवत चांगले यश संपादन केले. मग आयुष्याच्या अगोदरच ठरवलेल्या दिशेने जाण्यासाठी तिने पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मेरिटवर प्रवेश मिळवला. बी. ए. साठी विषय घेतला जर्मन भाषा! त्यात विशेष प्राविण्य मिळवल्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर्मन भाषेत एम. ए. चे शिक्षण डिस्टिंगशनमध्ये पूर्ण केले. ते चालू असतानाच पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सर्टिफिकेट इन जर्मन आणि इन्टेन्सिव्ह डिप्लोमा इन जर्मन असे दोन मोठे कोर्स पूर्ण केले, शिवाय जर्मन भाषेचे प्रगत अभ्यास केंद्र असलेल्या गॉएथे इन्स्टिट्युट (मॅक्‍समुल्लर भवन) येथे जर्मन भाषेमधली सी-1 लेव्हलची परीक्षा उत्तम श्रेणीत पास केली. त्यामुळे एम. ए. चा निकाल लागताच तिच्याकडे इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे कौन्सिलिंग एक्‍झिक्‍युटिव्ह या पदाच्या नोकरीचे पत्र होते.
नेहमीच्या मळलेल्या वाटेने जायला स्पष्टपणे नकार देऊन ही वेगळी वाट चोखाळणारी छोटी मुलगी म्हणजे आमच्या सातारची, कु. रुमानी श्रीनिवास वारुंजीकर! वडील श्रीनिवास नामवंत कवी आणि प्रभात या वृत्तपत्रात उपसंपादक! तर आई रसिका ब्युटिशियन. रुमानीने इतर मेंढरांप्रमाणे सायन्सला न जाता आर्टस साईडला जाणे आणि करियर म्हणून जर्मन या विदेशी भाषेची निवड करणे हे दुर्मिळच होते... समाजाच्या दृष्टीने आक्रीतच निर्णय होता तो! तिला नोकरी लागेपर्यंत नातेवाईक, परिचित, शेजारी, शाळेतले मित्र-मैत्रिणी असे सर्वजण तिच्याकडे अविश्‍वासानेच पहात होते. कसं काय होणार या मुलीचं ? असे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कायम असायचे. पण रुमानीसह तिच्या आई-वडिलांना तिच्या क्षेत्रातल्या संभाव्य यशाची खात्री होती. म्हणून तिने जाणीवपूर्वक निवडलेल्या या क्षेत्राला आई-बाबांचा पाठिंबा होता.
त्यांचा तो निर्णय अचूक ठरला आणि रुमानी नुकतीच इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी जर्मनीला जाऊन आली. कौन्सिलिंग एक्‍झिक्‍युटिव्हचे काम म्हणजे जी मुले शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर्मनीला जाऊ इच्छितात त्यांना मार्गदर्शन करणे हे आहे. भारतीय विद्यार्थ्यांकडे असलेल्या पदवीसाठी जर्मनीतील असलेल्या नोकरीच्या संधी याविषयी इत्यंभूत माहिती देणे हे तिच्या कामाचे स्वरूप आहे. इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वेबसाईटवरही तिच्या छायाचित्रासह तसा उल्लेख आहे. तसेच जर्मन भाषेत एम. ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ती मार्गदर्शन करते. जर्मनीत संपूर्ण शिक्षण मोफत आहे. फक्त तुम्हाला प्रवासाचा आणि राहण्या-जेवणाचा खर्च करावा लागतो. तिथे पार्टटाइम काम करूनही तुम्ही पैसे मिळवू शकता. फक्त जर्मनीत जाण्यासाठी त्यांची भाषा येणे हे अनिवार्य आहे.
पण खेदाची बाब अशी की, या मार्गाची माहिती आपल्या मराठी मुलांना नसते व ती माहिती करून घेण्याची इच्छाही नसते. जर्मनीमध्ये लागते ती फक्त गुणवत्ता, जी दहावी ते पदवीपर्यंत तुम्ही कष्टाने मिळवलेल्या विशेष प्रविण्यासह गुणांची! शिवाय अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातले तुमचे योगदान, तुमचे कम्युनिकेशन स्कील, मुलाखतीला सामोरे जातानाचा तुमचा आत्मविश्‍वास... फक्त याच गोष्टी तुम्हाला यशाकडे घेऊन जातात. मात्र शॉर्टकटने काहीच मिळत नाही.
रुमानीने मिळवलेले हे यश पाहिल्यावर एका जरी विद्यार्थ्याला किंवा पालकांना तिच्या मार्गाने जावेसे वाटले, तरी या लेखाचा उद्देश सफल झाला असे मी म्हणेन.
रूमानीचा मेल आय डी आहे :
rumanee84@gmail.com

अभय शरद देवरे,सातारा,
Mobile :- 94 22 606142
To Top