Sanvad News पालकांच्या कष्टाची जाणिव विद्यार्थ्यांना असावी:- तानाजीराव जाधव;कवठेएकंद शासकीय निवासी शाळेत पारितोषिक वितरण उत्साहात

पालकांच्या कष्टाची जाणिव विद्यार्थ्यांना असावी:- तानाजीराव जाधव;कवठेएकंद शासकीय निवासी शाळेत पारितोषिक वितरण उत्साहात

मुले शिकावित म्हणून पालक काबाडकष्ट करून त्यांच्या गरजा पुर्ण करतात. परंतु विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत. ही बाब गंभीर आहे. नेहमी पालकांच्या कष्टाची जाणिव  विद्यार्थ्यांना असली पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा फाऊंडेशनचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले. 
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील शासकीय निवासी शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी जाधव बोलत होते. त्यावेळी पत्रकार प्रदीप पोतदार, प्रा. संदीप कांबळे, अध्यक्ष शरद माने मुख्याध्यापक पी. सी. भातलवंडे आदी उपस्थित होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा  पारितोषिक वितरण करून गौरव करण्यात आला. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन तानाजी जाधव यांच्या हस्ते झाले.
तानाजी जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्तापासून ध्येय निश्चित केले पाहिजे. आपल्या जगण्याला दिशा नसेल तर सारे व्यर्थ आहे. यश आणि अपयश यांच्यामध्ये फक्त प्रयत्न असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रयत्नवादी बनले पाहिजे.  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण प्रत्येक नागरिकाने जोपासली पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिस्त,आदर, अभ्यासूपणा आत्मसात केला पाहिजे. मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी महापुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे. असे सांगून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अधीक्षक व्ही. पी. मर्नहोळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संदीप कांबळे, प्रदीप पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. 
संयोजनासाठी मुख्याध्यापक पी. सी. भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एन.वाघमारे, व्ही. के. बर्गे, डि. एन. शिंदे, एन. एस. साळुंखे  यांचे सहकार्य लाभले.

To Top