Sanvad News मातृभाषेतून शिक्षण हे सर्वांगसुंदर शिक्षण - वैजनाथ महाजन; सूर्यवंशीवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत बहरले बालकुमार साहित्य संमेलन..

मातृभाषेतून शिक्षण हे सर्वांगसुंदर शिक्षण - वैजनाथ महाजन; सूर्यवंशीवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत बहरले बालकुमार साहित्य संमेलन..


        आताची पिढी निर्विवादपणे हुशार आहे. मुलांमध्ये चांगल्या भावना निर्माण व्हायच्या असतील तर मुलांनी कथा , कविता, कादंबरी वाचली पाहिजे. अनेक जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ हे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकले. मातृभाषेतून शिक्षण हे सर्वांगसुंदर शिक्षण आहे. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी केले.जिल्हा परिषद शाळा सूर्यवंशीवाडी(येळावी),ता. तासगाव व सानेगुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बालकुमार 
बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
  संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी शाळेतील  वाटचालींचा आढावा घेतला.
      यापुढे बोलताना वैजनाथ महाजन म्हणाले की,तळमळीतून शब्द निर्माण होतात. गांधीजींच्या तळमळीतून नाना पाटलांच्या चळवळीतून देश स्वतंत्र झाला. टिव्ही पालकांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होते आहे.विद्यार्थ्यांनी शिकताना ध्येय निश्चित केले पाहिजे.प्रामाणिकपणे एकाग्रतेने काम केल्यास अपेक्षित यश मिळविणे सोपे जाते. शंकपुष्पी घेऊन ज्ञानेश्वर तयार होत नाही. मुलाची बुद्धी तो वाचतो किती, त्याची एकाग्रता किती यावर अवलंबून असते.टिव्ही मालिकेतून नवीन काही मिळत नाही, इतर चॅनेलमधून काही नवीन गवसू शकते.आपल्याला बुद्धिमत्तेचा आदर करता येतो का? हाच खरा प्रश्न आहे. नेत्यांच्या मागेपुढे फिरून काही सिद्ध होत नाही. स्वतः च राबून स्वतः ला सिद्ध करणे गरजेचे आहे. शिक्षण हे लोकवर्गणीतून चालले पाहिजे असे कर्मवीर आण्णा म्हणायचे. याचा प्रत्यय या संमेलनाच्या आयोजनातून येतो आहे.

  सकाळी टाळ- मृदंग,लेझीमच्या गजरात काढलेल्या  ग्रंथ दिंडींने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. यामध्ये भगव्या रंगाच्या पारंपारिक वेशात सहभागी झालेल्या विद्यार्थानी संमेलनालाचा उत्साह वाढविला.ग्रंथदिंडी प्रसंगी गावातील महिलांनी ठिकठिकाणी स्वागत केले.पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
कथाकथन सत्राचे प्रमुख पाहुणे वाळवण' कादंबरीकार रवी राजमाने यांनी आपल्या 'छोटा रिचार्ज' ह्या कथेतून विद्यार्थ्यांना खळखळून हसवत प्रामाणिकपणाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले.  या सत्राचे अध्यक्ष बालभारतीच्या पाठाचे लेखक संदीप नाझरे यांनी 'आईच काळीज' या कथेतून आईची महती सांगितली.या सत्रात ह.रा. जोशी यांच्या ग्रामीण कथेला पालकांनी विषेश दाद दिली.


 यावेळी गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवि संमेलन सत्रात ५०बालकवींनी सहभाग घेतला.यावेळी गोडबोले काकांनी आपल्या बडबडगीतांमधून विद्यार्थ्यांना सुर धरायला लावला.उपक्रमशील  शिक्षिका भाग्यश्री चौगुले यांनी  सादर केलेल्या मनोरंजन नाटिकेने संमेलनात जान आणली.त्यांच्या प्रबोधन कवितांवर उपस्थित महिलांनी ठेका धरला.

             विद्यार्थ्यांच्या बुध्दीअंकाच्या बरोबर भावांक महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे संस्कार म्हणजे भावांक. विद्यार्थी फक्त गुणवान नाही तर संस्कारक्षम झाले पाहिजेत असे प्रतिपादन  संस्कार केद्राचे सुभाष कवडे यांनी व्यक्त केले.जि.प.सदस्य स्नेहल पाटील, सभापती कमल पाटील,उपसभापती डाँ. शुंभागी पाटील ,सरपंच रेखा माळी, शिक्षण विस्तार अधिकारी गीता शेंडगे,भारत बंडगर, वैभव बंडगर,वैभव आंबी,ह.रा.जोशी, हंबीरराव सुर्यवंशी,महादेव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
संयोजन साने गुरुजी संस्कार केंद्राचे सुभाष कवडे, मुख्याध्यापक उद्धव टोणपे,संतोष पाटील,   सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी केले. सूत्रसंचालन मेघाली पाटील यांनी केले.

To Top