मुंबई.
भारतीय संविधानातील मूलतत्त्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये २६ जानेवारीपासून संविधानाचे वाचन हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.गायकवाड म्हणाल्या, २६ जानेवारी १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्विकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे संविधान २६ जानेवारी १९५० पासून अमलात आले.
भारतीय संविधानाची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मूलतत्वे, संविधानिक हक्क आणि कर्तव्य स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना सहकार्य करणारे आहेत. या वयातील मुलांच्या संस्कारक्षम मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल. त्याविषयीची सुरुवात शालेय जीवनापासून होणे अभिप्रेत आहे. यासाठी शाळांमध्ये दररोज परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूहाने वाचन करण्यात यावे, असा निर्णय ४ फेब्रुवारी २०१३ रोजी शासनाने घेतला होता.
मात्र या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यातील सर्व शाळा शाळा सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘संविधानाचे सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे‘ या उपक्रमाच्या अंतर्गत दररोज परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमाची सुरुवात २६ जानेवारी २०२० पासून करण्याबाबत शिक्षण आयुक्तांना सर्व क्षेत्रीय अधिकार्यांकडून नियतकालिका आढावा घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असेही गायकवाड़ यांनी सांगितले.