विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात पाहिला 'तानाजी द अनसंग वॉरियर्स '
मंगळवार , दिनांक २८/१/२०२० रोजी प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर यांना इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनी अनुष्का सतीश जाधव चा रजा हवी असल्याचा अर्ज आला. आणि त्या अर्जाद्वारे विद्यार्थिनीने ' तानाजी द अनसंग वॉरियर ' हा चित्रपट पाहण्याची चक्क परवानगी मागितली होती. सदर चित्रपट ऐतिहासिक असून तानाजींचा इतिहास समजून घेण्यासाठी चित्रपट पाहायचा आहे ,असे त्या रजा अर्जात नमूद करण्यात आले आहे. शिवाय इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास पुस्तकात शूरवीर मावळे तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित पाठ आहे.
सदर रजा अर्जाचा विचार करून प्राचार्या वैशाली कोळेकर,कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी संस्थेशी चर्चा करून सर्व विद्यार्थ्यांना तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला .त्या दृष्टिकोनातून आज भैरवनाथ चित्रमंदिर विटा येथे दुपारी १२ ते ३ च्या शो ला सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहण्याचा आनंद घेण्याबरोबरच आपले ऐतिहासिक ज्ञान वृद्धिंगत केले आहे .
*चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया*
१) शरयू मेटकरी - चित्रपट छान आहे परंतु चित्रपटातील काही गोष्टी व पुस्तकातील गोष्टी यामध्ये फरक जाणवला.
२)अमितोधन कांबळे - गडावर दोराच्या सहाय्याने चढणारे मावळे खूप आवडले.तानाजी मालुसरे पुन्हा जन्माला यावेत असे वाटते.
३)सिद्धार्थ चोथे - तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला तेव्हा खूप रडू आले.
४)प्रथमेश जानकर - मावळे दोराच्या सहाय्याने गडावर चढताना आश्चर्य वाटले.
५)तानाजी मालुसरे व उदयभान यांची लढाई पाहताना अंगावर काटा आला.
६)समृद्धी पवार - स्वराज्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे तानाजी मालुसरे खूप आवडले.
सदर उपक्रमास प्रशालेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांच्यासह प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.भैरवनाथ चित्रमंदिर विटा येथील दुपारी १२ ते ३ च्या शो ला सर्व चित्रमंदिर प्रशालेने बुक केले होते. प्रशालेचे राबलेल्या या उपक्रमाबद्दल राज्यातून प्रशालेचे कौतुक होत आहे.