Sanvad News विट्यात आज बालकुमार साहित्य संमेलन; सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालयाचे आयोजन- बालसाहित्यिक सांभाळणार व्यासपीठाची जबाबदारी.

विट्यात आज बालकुमार साहित्य संमेलन; सौ.विजयमाला पतंगराव कदम वाचनालयाचे आयोजन- बालसाहित्यिक सांभाळणार व्यासपीठाची जबाबदारी.



    लहान मुलांच्या साहित्यिक प्रतिभेला संधी मिळावी यासाठी सौ. विजयमाला पतंगराव कदम वाचनालय, विटा यांच्यावतीने बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी व गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे.या संमेलनाचे उद्घाटन बालसाहित्यिका कु. शरयु मेटकरी यांच्या हस्ते होईल .संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कु. सानिका पाटील तर कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कु. संचीता रुपनर आहेत . संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभयराज तामखडे तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून हर्षवर्धन मेटकरी आहेत अशी माहिती संयोजिका वैशाली कोळेकर यांनी दिली.

      कोळेकर पुढे म्हणाल्या की, मराठी साहित्य संमेलनास समृद्ध परंपरा लाभली आहे.मात्र मोबाईल, टीव्ही,संगणकाच्या युगात वाचन आणि साहित्य संस्कृती टिकवून ठेवण्याचे खरे आवाहन समाजासमोर आहे.त्यामुळे मुलांना बालवयातच वाचन आणि साहित्य निर्मितीची गोडी लागावी, यासाठी विटा येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.

       या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनअध्यक्ष, स्वागताध्यक्ष , कवी संमेलनअध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उद्घाटक ही सर्व पदे बालसाहित्यिक भूषवणार आहेत.


   या संमेलनात श्रेया रसाळ, ऋतुजा महाडिक, गौरजा रंगाटे , ईशा साळुंखे, राजलक्ष्मी फाळके ,साक्षी जाधव, श्रुती नवगिरे , शुभांगी जानकर,तृप्ती सावंत, सार्थक जगदाळे आदी बालसाहित्यिक उपस्थित राहणार आहेत. सोबतच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक रघुराज मेटकरी,चंद्रकांत देशमुखे, एम.बी. जमादार , प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड , विठ्ठल भागवत, विष्णुपंत मंडले या साहित्यिकांचे ही आशीर्वाद या बाल साहित्यिकांना मिळणार आहेत .

     सदर बालकुमार साहित्य संमेलनात मुख्य कार्यक्रमास सोबत परिसंवाद, कविसंमेलन ,लेखकाची मुलाखत , कथाकथन, ग्रंथदिंडी ,ग्रंथ प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचा समावेश केला आहे ,अशी माहिती वैशाली कोळेकर यांनी दिली.
To Top