‘सामान्य माणसांच्या बोलीभाषांमध्ये समाजाला सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे सामर्थ्य असते. आज एकविसाव्या शतकात मराठीसह जगातील सर्वच भाषा संक्रमणातून जात आहेत. अशा काळात बोलीभाषांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहेत. प्रदेशनिष्ठ संस्कृती टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य बोलींमध्ये असते. तेव्हा बोलींचे संवर्धन करणे हेच एकविसाव्या शतकातील आव्हान असणार आहे. असे प्रतिपादन मराठीतील नामवंत लेखक व कथाकथनकार हिंमत पाटील यांनी केले.
रामानंदनर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयामध्ये आयोजीत मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले जोपर्यंत शेतकरी शेती पिकवत राहील तोपर्यंत त्या त्या प्रदेशातील बोली जिवंत राहतील. कृषिसंस्कृतीची स्वत:ची स्वतंत्र भाषिक व्यवस्था आहे. केवळ एक बैलगाडी नष्ट झाली तरी बैलगाडीसंदर्भांतील शेकडो शब्द नष्ट होतील. प्रमाण भाषा समृद्ध करण्यात बोलींचे मोठे योगदान असते.
मातृभाषेत ज्ञान उपलब्ध करून दिले तर खऱ्या अर्थाने शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचहण्यास मदत होईल. असे प्रतिपाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतात केले. या सोहळ्यानिमित्त मराठी विभागाच्यावतीने ‘जागर’ या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. विद्याधर पाटील, उपप्राचार्य डॉ. काकासाहेब भोसले, मराठी विभागप्रमुख प्रा. दिलीप कोने, संदिप नाझरे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. तेजस चव्हाण तर सूत्रसंचालन प्रा. स्वाती मगदूम यांनी केले.