★व्हॅलेंटाईन वीक निमित्त अंनिस तर्फे राज्यभर जोडीदाराची विवेकी निवड संवादशाळांचे आयोजन.
थंडीचे दिवस अधिकच गुलाबी करून टाकणारा हा आठवडा.
सध्या राज्यभरातील शाळा, महाविद्यालयीन तरूणाई मध्ये व्हॅलेंटाईन वीकचा उत्साह संचारलेला दिसतो आहे. हा व्हॅलेंटाईन ज्वर लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे राज्यभर संवाद परिषदांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. यामध्ये तरूणाईला प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजावून जोडीदाराची विवेकी निवड कशी करायची याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
महाविद्यालयाच्या महिला सशक्तीकरण समिती आणि इंग्रजी विभागाच्या वतीने संवाद शाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा.अरविंद औंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संवादशाळेचे संयोजन प्रा. मृणालिनी आहेर यांनी केले.
या संवादशाळेचे विषयतज्ञ अंनिसचे हर्षल जाधव, स्वाती कृष्णात यांनी तरूणाईशी संवाद साधला.
प्रेम आणि आकर्षण यातला फरक अनेकांना माहीत नसतो. लग्न झाल्यानंतर पुढे जाऊन वाद होतात. संसार आणि सहजीवनातील फरकही वेळीच समजून घेतला, तर आयुष्य अधिक गुणवत्तापूर्ण व क्रियाशील होण्यास मदत होते. त्यादृष्टीने अशा संवादशाळांसारख्या उपक्रमांची अधिक गरज असल्याचे मत या संवादशाळेचे अध्यक्ष डॉ. अरविंद औंदकर यांनी व्यक्त केले.
लग्नाची परंपरागत कांदा-पोहे पद्धत आणि प्रेमविवाहापेक्षा वेगळ्या, कालसुसंगत असणाऱ्या या नवीन पद्धतीची ओळख महाविद्यालयीन युवक-युवतींना व्हावी यासाठी या संवादशाळेचे आयोजन केलेले आहे.
जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न होय. आपल्या जोडीदाराची फक्त निवड नाही तर विवेकी निवड का आणि कशी?
हे समजून घेण्यासाठी ही संवादशाळा असल्याचे सांगून प्रा. मृणालिनी आहेर यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
पहिल्या सत्रात हर्षल जाधव म्हणाले,
काही कर्मठ पालक असतात. तो कर्मठपणा जातीय, धार्मिक, वर्गीय अहंगंडातून आलेला असतो किंवा अाणखी कशातून. पालक लोक समाजातली पत, लोक काय म्हणतील, वगैरे बुरसट विचार करून अापल्या मुलामुलीच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याबाबत नकारघंटा वाजवत असतात. आईबाप आपले जगातील सर्वश्रेष्ठ हितचिंतक असतात हे खरं असलं तरी, आपल्या मुलाचं/मुलीचं हित कशात आहे हे आपल्यापेक्षा त्यांना जास्ती कळू शकते ह्याची काही आईबापांना कल्पनाही नसते. ते त्यांना समजावून सांगणे कठीण काम. आणि म्हणुनच आम्ही जोडीदाराची विवेकी निवड ही संवादशाळा आपल्यासाठी आणली आहे.
यावेळी यांनी प्रेम, लग्न, जात व हिंसा या विषयावर सविस्तर माहिती दिली. जोडीदाराची विवेकी निवडीविषयी संवाद साधून प्रेम आणि आकर्षण यातील फरक, जोडीदाराची निवड विवेकी पद्धतीने कशी करावी याबाबत संवाद, चित्रफीत दाखवून योग्य प्रबोधन केले.
संवादशाळेच्या दुसऱ्या सत्रात स्वाती कृष्णात यांनी जोडीदाराची विवेकी निवड का?, जोडीदाराची विवेकी निवड कशी? याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,
लग्न म्हणजे फोटोग्राफीचा किंवा मिरवणुकीचा इव्हेन्ट नाही. इथे जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य काढायचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला समजून घेणारी, सुख -दुःखाच्या काळात साथ देईल अशा व्यक्तीची , आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड करायला हवी. फेसबुकवर दोघांच्या फोटोला मिळणारे लाईक्स, किंवा माझा पार्टनर सुंदर आहे म्हणून आयुष्य सुखी होत नाहीत. अनेकजण फक्त शिक्षण, नोकरी, घराणं, जात-पात, धर्म यासारख्या गोष्टी पाहून लग्न करतात. पण यातली कोणतीच गोष्ट, भविष्यात तुमची वैवाहिक आयुष्यात घुसमट होणार नाही, याची गॅरंटी देत नाही. लग्न केल्यानंतर अनेकवेळा जोडीदाराकडून बंधनं लादली जातात. विशेष करून मुलींवर तर कपडे कोणते घालायचे, नोकरी करायची नाही, आई - वडिलांना भेटायचं नाही अशी अनेक बंधनं लादली जातात. लग्न करण्यापूर्वीच भावी जोडीदाराशी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बोलून घ्या.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी या आगळ्यावेगळ्या संवादशाळेचे स्वागत करून नवीन विचार दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी संकल्पपत्र भरुन आधुनिक विज्ञानवादी पत्रिकेचा स्विकार करण्याचा संकल्प केला.
या संवाद शाळेस उपप्राचार्य काकासाहेब भोसले, प्रा. व्ही. एस. राऊत, प्रा. यु. पी. पाटील प्रा. एस. पी. सुतार, प्रा.एस. एस. नदाफ, प्रा.संदेश दौडे यांचे सहकार्य लाभले.