Sanvad News निष्ठा आणि कष्ट हाच यशस्वी जीवनाचा मार्ग :- तानाजी जाधव;ब्रम्हानंद विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ

निष्ठा आणि कष्ट हाच यशस्वी जीवनाचा मार्ग :- तानाजी जाधव;ब्रम्हानंद विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ

चंगळवादी जगात निष्ठा आणि कष्ट हाच यशस्वी जीवनाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले.
ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर (ता. पलूस) या विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते.
 अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत विनोदी शैलीत तानाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
तानाजी जाधव म्हणाले, आज विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणारे, त्यांना व्यसनाच्या वाटेवर नेणारे अनेक चंगळवादी मार्ग समोर आहेत परंतु आपल्या भवितव्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. स्पर्धेच्या युगात मुली मुलांच्या पुढे जात आहेत आणि मुले आपली शक्ती राजकारण तसेच टवाळक्या करण्यात वाया घालवत आहेत. त्यामुळे आपण नेमके काय केले पाहिजे हे ठरवण्याची गरज आहे. जर आपण आपले ध्येय ठरवले नाही तर आयुष्यभर अंधारात चाचपडत बसावे लागेल आणि आपल्या नशिबी गुलामी येईल, याचे भान ठेवायला हवे. आपली संगत चांगली नसेल तर चांगले काहीच घडणार नाही, हे लक्षात ठेवावे म्हणून सज्जनाची संगत हाच आपला उद्धार आहे याची जाणीव ठेवावी.

 ब्रह्मानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ साहित्यिक विजय जाधव, रवि राजमाने, अमोल जाधव उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय पी. बी. पाटील यांनी करून दिला. अभिनव तावदर यांनी प्रास्ताविक केले. साक्षी यादव, हर्षदा शिंदे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वाती निकम यांनी केले. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.
To Top