कै.वि. स.पागे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. २ ऑक्टोबर १९६९ रोजी विसापूर जि.सांगली येथे सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेने खऱ्या अर्थाने १९७२ च्या दुष्काळात राज्यातील लोकांना जिवंत ठेवण्याचे काम केले."मागेल त्याला काम व कामानुसार दाम" हे या योजनेचे वैशिष्ट्यं होतं.१९७७ साली महाराष्ट्रात वि.स.पागे यांच्या सूचनेनुसार अस्तित्वात आलेला रोजगार हमी कायदा महाराष्ट्राचे पुरोगामित्त्व सिद्ध करणारा क्रांतिकारक कायदा होता.आजही महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेवून आपला दुष्काळ कायमचा हटविता येईल , असे प्रतिपादन मुख्याध्यापक डी. एन. माने यांनी केले.
नागठाणे ( ता. पलूस )येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि स पागे यांचा 30 वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.प्रारंभी कै. पागे यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक डी. एन. माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिक्षिका मंदाकिनी सपकाळ यांनी आपल्या भाषणातून वि. स. पागे पागे यांचा जीवनपट उलगडला. त्या म्हणाल्या , पागे हे जरी राजकारणात असले तरी त्यांचा मूळ पिंड कवी व साहित्यिकाचा होता . संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते.राजकारणात राहूनही त्यांच्या मनातील कविता कधी हरविली नाही. त्यांचे 'अमरपक्षी' व 'पहाटेचे नोबत'' हे दोन कवितासंग्रह आहेत. याशिवाय 'तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत' हे त्यांनी लिहिलेले उत्कृष्ट नाटक आहे. पागे यांनी निर्माण केलेल्या रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. विसापूर सारख्या गावातून शुभारंभ केलेली ही योजना पुढे राज्य व केंद्र सरकारने स्वीकारली.
स्वागत व प्रास्ताविक जयश्री गवळी यांनी केले. आभार मोरेश्वर साठे यांनी मानले. कार्यक्रमास दिलशाद मुलाणी , डी. के.सूर्यवंशी , उल्हास मिरजकर आदी उपस्थित होते