चोपडेवाडी ता.पलूस येथील रहिवासी असणारी कु. आराधना कृष्णात यादव हिने ९७.०% गुण प्राप्त करून
तक्षशिला स्कूलमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इंग्रजी, गणित, हिंदी, सामाजिकशास्त्र, विज्ञान विषयात ९६ पेक्षा अधिक गुण आराधना यादव हिने प्राप्त केले आहेत. आराधनाचे वडील कृष्णात यादव हे शेतकरी तर आई सौ.रेखा यादव या चोपडेवाडी गावाच्या पोलीस पाटील आहेत. चोपडेवाडी व भिलवडी पंचक्रोशीत सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत प्रथमच ९७.०% गुण प्राप्त करून आराधनाने विक्रम नोंदवून ग्रामीण भागातील मुलीही शिक्षण क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिले आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्याआराधना यादव हिने प्राप्त केलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल तिच्यावर समाजातील सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुकचा वर्षाव होत आहे. आराधना यादव हिला तक्षशिला स्कूलच्या प्राचार्या पदमावती पळसे, रिध्दी संतूरकर, जयश्री पाटील या सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वडील कृष्णात यादव व आई सौ.रेखा यादव यांचे प्रोत्साहन व आशीर्वाद मिळाले.
या यशाबद्दल बोलताना आराधना यादव म्हणाल्या पहिल्या दिवसापासून सातत्यपूर्ण अभ्यास करीत होते. कोणताही ताण तणाव न घेता आनंदाने व आवडीने अभ्यास केला. हा अभ्यास करताना मी माझे इतरही छंद जोपासले होते. सर्व दैनंदिन कार्य करत मी प्रामाणिकपणे रोज नित्यनेमाने तीन तास वेळ देऊन अभ्यास पूर्ण केला. स्वयं अध्ययन व विषयातील सर्व संकल्पना स्पष्ट पणे समजावून घेतल्यांमुळे कोणतंही दडपण मला परीक्षेला जाताना आले नाही. मला जीवनामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे आहे. त्या दृष्टीकोनातून माझे प्रयत्न सुरू आहेत. जीवनामध्ये ध्येय असेल, दृढनिश्चय, निश्चित दिशा व प्रयत्नांची सातत्य असेल तर यश नक्की मिळते हा आत्मविश्वास मला प्राप्त झाला आहे. माझ्या यशामध्ये माझे आई-वडील, शाळेचे सर्व शिक्षक, माझे आजी-आजोबा, माझा भाऊ, नातेवाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.