Sanvad News नवीन शिक्षण पद्धती आता तुमचा मुलगा गाढव होणार नाही !

नवीन शिक्षण पद्धती आता तुमचा मुलगा गाढव होणार नाही !


एक तरुण इंटरव्हिव रूम मध्ये बसला होता. समोर तीन प्रोफेशनल्स चष्मा आणि टाय लावून बसले होते.
एकाने तरुणाकडे पाहून विचारले, “Tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?"
तरुणाने उत्तर दिलं- "छत्र्या!"
दुसर्या टाय वाल्या लठ्ठ CEO ने विचारलं- " यावर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?"
तरुणाने उत्तर दिलं- " मला... कारण माझं नुकतंच लग्न झालं असून बायकोच नाव आहे पद्मश्री !!"
इंटरव्हिव घेणारा तिसरा माणूस वैतागून म्हणाला-" काही डोक आहे का तुला?"
तरुणाने शांतपणे उत्तर दिलं-" हो, खूप डोक आहे. शाळेत भरती झाल्यापासून ह्या interview पर्यंत सगळे जण तेच खात आहेत."
CEO ने विचारलं, " तुझ्या bio - data मध्ये M A , B f t डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?"
तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं-" Matric appeared but failed thrice "
त्यावर CEO ने चिडून फाइल आपटली आणि ओरडला-
" फार मोठा गाढव आहेस तू !!"
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- "साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे"
इंटरव्हिव घेणारे गाढव बनले आणि इंटरव्हिव देणारेही. पण आता हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल केला जात आहे.
आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत जास्तीत जास्त ज्ञान मिळवणे, माहिती साठवून घेणे हेच शिक्षण बनले होते. १००% मार्क, कराटे खेळताना ब्लॅक बेल्ट मिळवला पाहिजे, उत्तम डान्सर व्हायला हवे, architecture , engeenering ला चित्रकलेचे मार्क पाहतात म्हणून त्याही परीक्षेत चांगल्या ग्रेड मिळायला हव्यात.  भगवतगीतेमध्ये प्रथम क्रमांक पाहिजे. त्या श्लोकांचा अर्थ कळत नसला तरी परीक्षेत अव्वल असायला हवे. हॉबी म्हणून तबला, गिटार यायला हवी....मुलांवर आतापर्यंत माहिती आणि ज्ञानाचा प्रचंड मारा चालला होता. त्यातून जीवघेणी स्पर्धा उभी राहिली होती. त्यामागे भलेमोठे अर्थकारण उभे राहिले होते. अल्बर्ट आईन्स्टाईन बनवून देणाऱ्या मल्टि नॅशनल शाळा आल्या होत्या. कोणी विज्ञान शिकवत होतं, तर कोणी संगीत. कोणी अभिनय तर कोणी भूगोल. मुलगा एकच, पण त्याच्यावर अनेक विषयांचा चारी बाजूने मारा चालला होता. त्यासाठी एका वर्षाला पालक इतके खर्च करत होते की त्यांना स्वतःला पूर्ण शिक्षण घ्यायलाही तितके रुपये लागले नाहीत.
हे प्रचंड अर्थकारण पाहून चलाख इन्वेस्टर्सने शाळा सुरु केल्या. बोर्डाचे अनेक प्रकार सुरु झाले. परिणामी मुलांना शिक्षणाच्या नावाखाली माहितीचे ओझे उचलवाले लागत होते. उठता बसता इंग्लिश कविता, मराठी व्याकरण, फिजिक्सचे प्रश्न, गणितातील सिद्धांत यांचा मारा सुरु झाला. मुले पुस्तकी किडा बनली. दुसरे काही विश्व उरले नाही. शारीरिक कष्ट संपल्यामुळे जाडेपणा आला, सतत पुस्तक, कॉम्प्युटर, मोबाईल वापरल्यामुळे आणि अपुऱ्या आहारामुळे चष्मा लागला. ना ऊन पावसाशी संबंध राहिला ना मित्र मिळाले. मानसशास्त्र सांगत की मनाच्या संतुलनासाठी समोरासमोर बसून हसले-खेळले पाहिजे. कधी रडू आलंच तर डोकं ठेऊन रडत येईल असा विश्वासाचा खांदा हवा. पण मागील वीस वर्षातील मुले हे सगळं गमावून बसली होती. शाळेची बस आली नाही तर चालत जाण्याइतकी ताकदही ह्या मुलांमध्ये राहिली नाही.
शालेय विद्यार्थ्यांशी बोलताना मोदींनी प्रश्न विचारला होता, " तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
हा प्रश्न जाणून बुजून विचारला होता. अपेक्षेप्रमाणे एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण मुले एसीमध्ये वाढतात. चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, पिझ्झा, नुडल असं जेवण जेवतात. हात पाय काडीसारखे पातळ बनतात. लहानपणी डायबेटीससारखे विकार दिसू लागतात. भारत डायबेटिसचं माहेर बनत आहे आणि शिक्षण व चुकीची आहार संस्कृती त्याचा पाया आहे. आता मुले चणे, शेंगदाणे, बाजरी, सुका मेवा आणि फळे खात नाहीत. लापशी, सातू हे पदार्थ त्यांनी कधी ऐकले नाहीत. उत्तम पोषण मूल्य असलेल्या घरगुती आहारापेक्षा ते पॅक्ड फूड खाणे पसंत करतात. ना धड शारीरिक वाढ होते, ना प्रतिकारशक्ती मिळते. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. जगात कुठेही तयार होऊ न शकणारे रक्त शरीरात तयार होते. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!
पण आत्मनिर्भर होताना हे दुष्टचक्रही थांबवले जाईल. अनेक विदेशी प्रॉडक्ट्सवर मर्यादा येत आहेत. ज्यामुळे उत्तम पोषण मूल्य असलेले आणि ह्याच मातीत तयार झालेले खाद्यपदार्थ मिळणार आहेत. ज्याचा थेट परिणाम भारतीयांच्या आरोग्यावर होईल.
नव्या शिक्षणात खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन ह्याचा समावेश असेल. मुलांना टीम वर्क कळेल. पालकांनीही मुलांना इंटरनेटच्या मायाजालातून बाहेर काढावे. व्हाट्स ऍप आणि फेसबुकपेक्षा प्रत्यक्ष मैत्री करायला लावावी. सुख दुःखाचे समोरासमोर देवाणघेवाण व्हायला हवी. मित्र किंवा मैत्रिणीचा मोठा मानसिक आधार मिळायला हवा. मुलाला दिलखूलास हसता यावे आणि ओक्शाबोक्शी रडताही यायला हवे. एकुलते एक मुल असल्यामुळे मनाविरुद्ध काही घडत नाही. मनाविरुद्ध घडले तर अशी मुले लगेच आत्महत्या करतात. कोणासोबत राहायची सवय नसल्यामुळे घटस्फोट होतात. ह्या उणीवांचा आतापर्यंत शिक्षणात विचार केला नव्हता.
म्हणून भारतीय शिक्षण सर्वांगीण नसल्याची खंत वारंवार बोलून दाखवली जात होती. ही पद्धत बदलण्याची राजकीय इच्छाशक्तीही नव्हती. उलट राजकारण्यांनीच शाळा-कॉलेज सुरु करून ह्यात आणखी भर घातली. मुलांना माहितीचे ओझे वाहणारे गाढव बनवले. ही मुले दुसऱ्या गाढवाकडे पाहून फक्त अनुकरण करायला शिकली. अनेक फॉर्म्युले त्यांनी तोंडपाठ केले पण स्वतःचा कोणताही फॉर्म्युला त्यांना शोधात येत नव्हता. तबला शिकले, पण स्वतःची रचना त्यांना करता येत नव्हती. अनेक मोठ्या व्यक्तींचं ते अनुकरण करत होते पण स्वतःची ओळख निर्माण करता येत नव्हती.
मुलांना जगायची कला शिक्षणातून मिळायला हवी. आपले साहित्य कळायला हवे. सुदैवाने मराठी साहित्य जगायचे बळ देते. संघर्ष करत वाट काढायला शिकवते. शिक्षणात मातृभाषेला महत्व दिल्यामुळे मराठी साहित्य शिकता येईल. निसर्गाची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांमधील चांगले विचार निवडणे शिकता येईल.
शिक्षणाचे वेगळे प्रयोग दुसऱ्या देशांनी कसे केले हेही पाहण्यासारखे आहे. जपान देशाने शाळेत एसी लावायला मनाई केली आणि प्रत्यक्ष ज्ञान मिळावे म्हणून झाडे लावायचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थी शाळेत आला की शाळेत वनस्पती किंवा वेल लावतो. त्याच्या वाढीचा प्रत्येक टप्पा अभ्यासतो. त्यातून स्वतःही शिकत जातो. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात ही प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली जाते. अमेरिकन शाळाही आता प्रात्यक्षिकांवर भर देऊ लागल्या आहेत. पुस्तकी शिक्षण कमी आणि प्रत्यक्ष अनुभव जास्त हा प्रयोग जर्मनीच्या शाळांनी करून त्याचे परिणाम तपासले. लहान मुलांची बोटे नाजूक असल्यामुळे वयाच्या आठव्या वर्षापर्यंत लिखाणापेक्षा इतर प्रयोगांवर भर दिला. चीन आणि उत्तर कोरिया ह्यांनी तर मुलांना सायकलची आवड लावली आहे. जेणेकरून भावी कळत पेट्रोलवर जास्त अवलंबून राहायची गरज निर्माण होणार नाही. फ्रान्ससारखा देशही आपला विद्यार्थी उद्या देश चालवणार आहे हा विचार करून शिक्षणात बदल करत आहे. आता भारतातही बदल होतं आहे.
तसेच सुदैवाने शिक्षण कसे असावे ह्याचे विचार प्रतिभावान भारतीय व्यक्तींनीही आधीच व्यक्त केले आहेत.
गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर त्यापैकीच एक.
त्यांची"शांतिनिकेतन" शाळा एका बागेत भरत असे. एका मोठ्या झाडाखाली बसून गुरुदेव शिकवत असत. सगळे विद्यार्थी त्या मोठ्या झाडाखाली बसून शिक्षण घेत असत. गुरुदेव नीट शिकवत आहेत की नाही हे पाहायला एकदा एक पालक शांतिनिकेतनमध्ये आले. बागेत आल्यावर त्यांना धक्का बसला. कारण गुरुदेव एका जागेवर शांत बसून होते आणि फक्त एक मुलगा त्यांच्यासमोर पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. बाकीची मुले स्वैरपणे बागडत होती. कोणी झाडावर चढला होता तर कोणी फुलपाखरांमागे धावत होता.
ते पाहून काळजीत पडलेला पालक रवींद्रनाथांना म्हणाला, " तुम्हाला ह्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटत नाही का? "
गुरुदेव म्हणाले, " खूप चिंता वाटते. पण बागडणाऱ्या मुलांची नाही तर माझ्यासमोर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलाची. कारण शिक्षण कुठून घ्यायचं आहे हे त्याला कळलं नाही."
गुरुदेव पुढे म्हणाले, " झाडावर चढावं, फुलपाखरांमागे धावावं असं मलाही वाटतं. पण आता शरीर साथ देत नाही. मी शरीराने प्रौढ झालो आहे, पण माझ्यासमोर बसलेला मुलगा आताच प्रौढ झाला आहे."
गुरुदेव रवींद्रनाथांनी शिक्षण कसे, कुठून मिळवायचे होते हे जाणले होते. तशी शाळाही उभी केली होती.
आता नव्या शिक्षण पद्धतीच्या शाळाही अशाच प्रकारचा अभ्यासक्रम राबवणार आहेत. मुलांना हसत खेळत शिकवणार आहेत. ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होईल. भविष्यातील भारत अधिक समृद्ध, विकसित होईल.

सौजन्य -
लेखक: निरेन आपटे
 ऑनलाइन पुस्तक: अमृताशी पैजा
 https://www.facebook.com/nirenaptethoughts/
वरील लिंकवर क्लीक करून इतर लेख वाचू शकता
To Top